जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२४
गेल्या काही वर्षापासून राज्यात गौतमी पाटील नेहमीच चर्चेत येत असतांना आता पुन्हा एकदा गौतमी चर्चेत आली आहे. राज्यात सध्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनची चांगलीच चर्चा आहे. बिग बॉस मराठीमध्ये अनेक दिग्गज कलाकार यावेळी स्पर्धक म्हणून गेले आहेत. यामध्ये चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांसह सोशल मीडिया स्टार्सचादेखील समावेश आहे. या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाची चांगली क्रेझ आहे.
राज्यात सध्या सोशल मीडियावर डान्सर गौतमी पाटील हिची देखील तशीच क्रेझ आहे. त्यामुळे गौतमी पाटील हिला आज पत्रकारांनी बिग बॉस मराठीची संधी मिळाली तर जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. गौतमी आज दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने मुंबईत आली. तिने अनेक नामांकीत आणि मानाच्या दहीहंडी कार्यक्रमांना भेट देत सर्वांचं मनोरंजन केलं. ती संध्याकाळी नवी मुंबईतील कार्यक्रमात पोहोचली. यावेळी तिने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काही चर्चा झाली नाही. असा तुम्ही काही विचार करु नका. सीएम साहेबांनी फक्त माझा मान-सन्मान केला. मी त्यांचा आभार मानते की, त्यांनी माझा सत्कार केला. खरंच मनापासून सीएमसाहेब मी तुमचा आभार मानते”, असं गौतमी पाटील म्हणाली. “खूप छान वाटतं. तुम्ही एक मराठी मुलीला भरभरुन प्रेम देता म्हणून छान वाटते. असंच प्रेम कायम राहू द्या”, असं आवाहन गौतमी पाटील हिने केलं.
“मुंबईची गोष्टच वेगळी आहे. मला मुंबईकरांचं प्रेम बघून खरंच खूप छान वाटतं. मी दहीहंडीला येते आणि बऱ्याच कार्यक्रमाला येते. खूप छान वाटतं”, असं गौतमी पाटील म्हणाली. बिग बॉस मराठीमध्ये संधी मिळाली तर जाणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गौतमी पाटीलने उत्तर न देणं पसंत केलं. “नवी मुंबईतला हा माझा पहिला कार्यक्रम आहे. इथे महिलांकडून खूप चांगलं प्रोत्साहन मिळालं”, असंही गौतमी म्हणाली.