जळगाव मिरर | २५ नोव्हेंबर २०२५
अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर ६७३ दिवसांनी इतिहास घडला. अभिजित मुहूर्तात, सकाळी ११:५० वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते राम मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर भगवा ध्वज फडकवण्यात आला. बटण दाबताच २ किलोचा धर्मध्वज आकाशात फडकला आणि राम मंदिराचे संपूर्ण काम पूर्ण झाल्याची घोषणा झाली. या क्षणी पंतप्रधान मोदी भावुक झाले आणि हात जोडून धर्मध्वजाला अभिवादन केले.
ध्वजारोहणापूर्वी पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत यांनी पहिल्यांदाच पहिल्या मजल्यावरील राम दरबारात पूजा–आरती केली. रामलल्लाचे दर्शन घेताना मोदींनी रामासाठी विशेष वस्त्र अर्पण केले. त्यांनी सप्त ऋषी, भगवान शेषावतार आणि लक्ष्मण यांच्या मूर्तींचीही पूजा केली. यापूर्वी मोदींनी साकेत कॉलेजपासून रामजन्मभूमीपर्यंत दीड किलोमीटरचा रोड शो केला. मार्गावर विद्यार्थ्यांनी फुले उधळून आणि महिलांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले.
ध्वजारोहण समारंभासाठी अमिताभ बच्चन यांसह अनेक सेलिब्रिटींना निमंत्रण पाठवण्यात आल्याची चर्चा होती; मात्र समारंभावेळी कोणताही सेलिब्रिटी उपस्थित नव्हता. मात्र देशभरातील विविध मठांचे संत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समग्र शहर १००० क्विंटल फुलांनी सजवण्यात आले आहे. मंदिर परिसर पाच-स्तरीय सुरक्षा व्यवस्थेखाली असून एटीएस, एनएसजी, एसपीजी, सीआरपीएफ आणि पीएसीचे जवान चोख पहारा देत आहेत. सकाळी रामलल्लाची विशेष आरती करण्यात आली होती. आज रामलल्लाने सोने आणि रेशीम धाग्यांनी विणलेले पीतांबर वस्त्र परिधान केले आहे.
कार्यक्रमात भाषण करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “प्रत्येक युगात रामाचे विचार आपली प्रेरणा राहतील. विकसित भारताकडे जाणाऱ्या प्रवासाला धैर्य, संयम, शक्ती आणि करुणेने सज्ज अशा रथाची गरज आहे. राष्ट्रीय हित स्वतःच्या हितापेक्षा मोठे मानले, तरच रामराज्य प्रेरित भारत घडेल.” त्यांनी ‘जय सियाराम’ या घोषणेने भाषणाची सांगता केली.
पंतप्रधानांचे भाषण सुमारे ३२ मिनिटे चालले. अयोध्येतील हा सोहळा राम मंदिराच्या इतिहासातील सर्वांगीण पूर्णतेचा क्षण ठरला.




















