जळगाव मिरर | १० फेब्रुवारी २०२६
बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतानाच त्याने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आणि कुटुंबाला अधिक वेळ देण्यासाठी गोविंदाने राजकारणातून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. एका नामांकित वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने ही माहिती स्पष्ट शब्दांत दिली.
गोविंदाने सांगितले की, मुलगा यशवर्धन आहुजा आणि मुलगी टीना आहुजा यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. राजकारणामुळे नकळत कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असल्याची जाणीव झाल्यानंतर हा कठोर पण आवश्यक निर्णय घ्यावा लागल्याचे त्याने सांगितले. “मी माझ्या कुटुंबासाठीच राजकारणातून एक्झिट घेतली आहे. माझं लक्ष पूर्णपणे राजकारणात गुंतलेलं होतं आणि त्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होत होतं. हे लक्षात आल्यानंतर हा निर्णय घेतला,” असे गोविंदाने स्पष्ट केले. तसेच, आपल्या मुलांच्या करिअरबाबत बोलताना गोविंदा म्हणाला, “मी निर्माता साजिद नाडियाडवालांना विनंती केली आहे की त्यांनी माझ्या मुलाला चित्रपट निर्मितीचे ज्ञान आणि अभिनयाचे धडे द्यावेत. योग्य मार्गदर्शनाखाली माझी मुले पुढे जावीत, हीच माझी इच्छा आहे.”
उल्लेखनीय म्हणजे, गोविंदाने मार्च २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांदरम्यान तो प्रचारासाठी सक्रिय होता आणि महाराष्ट्रातील विविध भागांत सभा व भाषणांसाठी उपस्थित राहिला होता. मात्र, राजकारणाचा परिणाम कुटुंबावर होऊ नये आणि मुलांच्या भविष्यासाठी पुरेसा वेळ देता यावा, यासाठीच त्याने महाराष्ट्राच्या राजकारणातून माघार घेतल्याचे सांगितले जात आहे. गोविंदाच्या या निर्णयामुळे त्याचे चाहते आश्चर्यचकित झाले असून, अनेकांनी याला मोठा धक्का मानला आहे.




















