जळगाव मिरर | ६ ऑगस्ट २०२४
श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यामुळे चोपडा तालुक्यातील धानोरा येथील दोघे दर्शनासाठी वडनगरी फाट्याजवळ असलेल्या बडे जटाधारी महादेव मंदिरात आले होते. दर्शन घेवून परतत असतांना समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या डि. जे.च्या वाहनाने त्यांना जोरदर धडक दिली. या अपघातात बाळू प्रल्हाद कोळी (वय ५०, रा. धानोरा, ता. चोपडा) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी फुपनगरी फाट्याजवळ दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सविस्तर वृत्त असे कि, यंदा श्रावणाला सोमवार पासून सुरुवात झाल्याने सगळ्याच महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जळगाव तालुक्यातील बडे जटाधारी महादेव मंदिरात सोमवारी अनेक तालुक्यांमधून भाविक कावड यात्रा घेऊन, दर्शनाला आले होते. बाळू कोळी हे देखील त्यांचे मित्र पिंटू सुतार यांच्यासोबत दर्शनाला आले होते. दर्शन घेतल्यानंतर तेी (एमएच १९, बीएन ८२६३) या दुचाकीने घरी जायला निघाले. मात्र, काही मंदिरापासून काही अंतर पार केल्यानंतर, समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच ०४, एफजे २२६३) क्रमांकाच्या डी.जेच्या आयशरने बाळू कोळी यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत बाळू कोळी व पिंटू सुतार हे दुचाकीवरुन कोसळले. त्यात बाळू कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पिंटू सुतार हे जखमी झाले. या अपघातानंतर इतर भाविकांनी तातडीने जखमीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
मयत बाळू कोळी यांच्या पश्चात पत्नी शोभा कोळी, मुलगा, २ मुली व आई असा परिवार आहे. ते धानोरा येथे शेतीचा व्यवसाय करत होते. त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात नातेवाईक व ग्रामस्थांनी गर्दी केली होती. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.