जळगाव मिरर | ११ ऑक्टोबर २०२६
यावल तालुक्यातील हंबर्डी ते फैजपूर रस्त्यावर सुरू असलेल्या कामादरम्यान अज्ञात ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात १२ वर्षीय सलित कवीराज चव्हाण या बालकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात ट्रक चालकासह रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदार आणि संबंधित अभियंत्याविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हंबर्डी ते फैजपूर रोडवरील हंबर्डी गावापासून फैजपूरच्या दिशेने सुमारे दीड किलोमीटर अंतरावर ९ ऑक्टोबरला रात्री ७ वाजता हा अपघात झाला. दरम्यान, कवीराज बारक्या चव्हाण हे आपल्या दुचाकी (एमपी- ६८, एमएच- ९८९४) द्वारे नुकसान झाले. या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार, रस्त्याचे काम सुरू असताना आवश्यक ती खबरदारी न घेतल्याचा तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी अपघातातील जखमी कविराज बारेला यांचे नातेवाईक अर्जुन बारेला यांनी फिर्याद दिल्यावरून अज्ञात ट्रकचालक, ओम कन्स्ट्रक्शन कंपनीचे मालक ओम कटरे आणि रस्त्याचे कामकाज पाहणारे अभियंता किरण लाकडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे स.पो.नि. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात हवालदार देवेंद्र पाटील करत आहेत. दरम्यान, रस्त्याचे काम सुरू असताना ठेकेदार आणि संबंधित अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने रस्ते कामांतील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कामाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था, इशारा फलक आणि वाहनचालकांना आवश्यक सूचना देण्याची जबाबदारी नेमकी कुणाची, हा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे.




















