
जळगाव मिरर | १८ एप्रिल २०२६
शहरातील बिबानगर परिसरात एका अल्पवयीन विद्यार्थीनीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढ्यावरच न थांबता संबंधित युवकाने मुलीच्या पालकांना जीवे मारण्याची धमकी देत थेट त्यांच्या घरावर दगडफेक करून दहशत माजवली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित युवक शाळेत ये-जा करणाऱ्या पीडित विद्यार्थीनीचा सतत पाठलाग करत होता. त्याच्या या वर्तनामुळे ती मानसिक तणावाखाली होती. काही दिवसांपूर्वी त्याने तिला दुचाकीवर फिरायला नेले असता तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. ही बाब मुलीच्या पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधित युवकाला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने आपले वर्तन सुधारण्याऐवजी पालकांनाच धमकावण्यास सुरुवात केली. युवकाने वारंवार घराबाहेर घिरट्या घालत दहशतीचे वातावरण निर्माण केले. तसेच घरासमोर चिठ्ठी टाकून आणि फोनवरून मुलीच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, १६ एप्रिल रोजी या प्रकाराने गंभीर वळण घेतले. संशयित युवकाने पुन्हा मुलीच्या घराजवळ येऊन घरावर दगडफेक केली. या घटनेत घराच्या खिडक्यांच्या काचा फुटून नुकसान झाले. या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित विद्यार्थीनी व तिच्या कुटुंबीयांनी अखेर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून संबंधित युवकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, वाढत्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी अशा प्रकारांबाबत तत्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.





















