
जळगाव मिरर / ३० डिसेंबर २०२२
भारतीय क्रिकेट टीममध्ये आपल्या फलंदाजीनं वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ऋषभच्या अपघाताची बातमी ऐकल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ऋषभच्या त्या अपघातावर प्रतिक्रिया देत त्याच्याप्रती काळजी व्यक्त केली आहे. धक्कादायक बातमी असून तो लवकरात लवकर बरा व्हावा ही देवाकडे प्रार्थना. असे मोदींनी म्हटले आहे.
ऋषभचा अपघात झाल्यानंतर जेव्हा तो कारच्या बाहेर येऊन मदतीसाठी हाक देत होता तेव्हा अनेकांनी त्याला मदत न करता त्याचा व्हिडिओ घेण्यास प्राधान्य दिले होते. आता तर त्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ऋषभचा अपघात झाल्यानंतर त्याच्या मदतीसाठी काही जण धावले होते. त्याच्या कारच्या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. १४ सेकंदाच्या त्या व्हिडिओमध्ये तर त्याची कार एवढी सुसाट होती की, पहिल्यांदा ती रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोखंडी बॅरियरला जाऊन धडकली. त्यानंतर त्या कारला आग लागली होती. कार जळून खाक झाली.
यावेळी हरियाणाच्या रोडवेज बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी ऋषभला तातडीनं रुग्णालयात दाखल केले. गाडीचालकाचे नाव सुशील कुमार असून त्यानं परिस्थिती पाहून ११२ नंबरला फोन लावला आणि मदतीसाठी आवाहन केले. पोलिसांनी वेळ न दवडता ऋषभला पुढील उपचारासाठी पुढील शहरात पाठवून दिले. त्या चालकानं सांगितलं की, ऋषभ कारमध्ये एकटाच होता. तोपर्यत त्याच्या कारनं पेट घेतला होता. आम्ही पहिल्यांदा त्याला कारच्या बाहेर काढले.त्याला आम्ही विचारले होते की, कारमध्ये आणखी कुणी होते का, त्यावर तो नाही असे म्हणाला. त्याच्या चेहऱ्याला दुखापत झाली होती. त्याचे कपडे फाटले होते.





















