जळगाव मिरर । २६ जानेवारी २०२३ ।
महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वीच आपले पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ते केव्हाही या घटनात्मक पदावरून दूर केले जातील, अशी शक्यता आहे. पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण याची अद्याप पुष्टी झाली नाही.
भाजप नेतेही यावर भाष्य करण्यास तयार नाहीत. पण भाजपने अमरिंदर यांना महाराष्ट्राचे राज्यपाल पद देऊन पंजाबमध्ये राजकीय फायदा लाटण्याची जोरदार तयारी केल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी सुरुवातीला लोकसभेच्या माजी अध्यक्षा तथा भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांचे नाव चर्चेत होते. पण त्या मुंबईच्या असल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर गुजरातमधील एका नेत्याचे नाव चर्चेत आले. पण ते ही मागे पडले. आता अचानक काँग्रेसचे माजी बंडखोर नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव समोर आले आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते पंजाबचे माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्षही होते. त्यांनी 2002 ते 2007 पर्यंत मुख्यमंत्री म्हणून पंजाबची धूरा वाहिली होती. त्यांचे वडील पटियाला राज्याचे शेवटचे राजे होते. त्यांनी 1963 ते 1966 पर्यंत भारतीय लष्करातही योगदान दिले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अमृतसर मतदार संघातून विजय मिळवला.