जळगाव मिरर | २८ नोव्हेबर २०२३
राज्यात गेल्या काही वर्षापासून अल्पवयीन मुलांची खरेदी- विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केल्यानंतर आरोपींच्या चौकशीतून त्यांची क्रूरता आणि निर्दयीपणाचा कळस गाठणारे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. यातील अटक आरोपी बाळकृष्ण कांबळे (३३) याने स्वतःच्या दोन मुलांसह मेहुणी, बहिणीच्या मुलांची विक्री केली. तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याने पत्नीच्या अन्य एका व्यक्तीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या मुलालाही विकल्याचे तपासात समोर आले आहे. गुन्हे शाखेने चिपळूण, विरारमध्ये कारवाई करत टोळीतील आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे.
नशेसाठी नवजात मुलीसह मुलाला विकणाऱ्या शब्बीर आणि सानिया या खान दाम्पत्यासह शकील मकराणी याला अटक केली होती. मकाराणीच्या चौकशीतून गुन्हे शाखेच्या कक्ष ९चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने भायखळ्यात राहणारी मास्टरमाइंड गृहिणी वैशाली जैन (४५) हिच्यासह चार जणांना अटक केली.वैशालीकडे मिळालेली नवजात मुलगी कांबळेची असल्याचे समोर आल्यानंतर कांबळेचे अन्य कनेक्शन उघडकीस आणण्यास गुन्हे शाखेला यश येत आहे. गार्बेज लोडिंग करणाऱ्या बाळकृष्ण कांबळे याने स्वतःच्या दोन मुलांसह मेहुणीचा, बहिणीचा मुलगा विकल्याचे समोर आले. सहा ते सात वर्षांपासून सक्रिय कांबळे गेल्या सहा ते सात वर्षांपासून यामध्ये सक्रिय आहे. त्याने एकट्याने आतापर्यंत सहाहून अधिक मुलांची दोन ते पाच लाखांत विक्री केल्याची माहिती समोर येत आहे.