जळगाव मिरर | ५ मार्च २०२४
चंद्रपूर जिल्ह्यातील मौशी येथील तिहेरी हत्याकांडाने चंद्रपूर जिल्हा हादरला असून, आई व दोन्ही मुलींच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे मौशी गावात शोककळा पसरली असून, आरोपी अंबादास तलमले (५०) याला नागभीडच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोडठी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आरोपीची चंद्रपूरच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
नागभीड तालुक्यातील मौशी येथे रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास दारूड्या विक्षिप्त बापाने पत्नी व दोन मुलींची कुऱ्हाडीने वार करून झोपेतच निघृण हत्या केली. हत्येचे ठोस कारण अद्यापही समोर आले नसले तरी या कुटुंबातील १६ वर्षांचा अनिकेत पोरका झाला आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी रविवारी मौशी गावात भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर नागभीड पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या. या प्रकरणातील आरोपी अंबादास तलमले याला नागभीड पोलिसांनी रविवारीच ताब्यात घेतले होते. त्याला नागभीडच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयात हजर केले.
असता कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने चंद्रपूरच्या कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली आहे. आरोपीवर भांदवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन व उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात नागभीडचे ठाणेदार विजय राठोड करीत आहेत.
रविवारची सकाळ नागभीड तालुक्यातील तिहेरी हत्याकांडाच्या घटनेने हादरा देणारी ठरली. आई व दोन्ही मुलींच्या मृतदेहांचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मौशी येथील स्मशानभूमीत एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी स्मशानभूमीतील वातावरण अतिशय शोकाकुल होते. या घटनेमुळे प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तरळताना दिसून आले. यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
दरम्यान, या कुटुंबातील १६ वर्षांचा अनिकेत या घटनेमुळे हादरून गेला असून, रविवारी रात्री त्याची तब्येत खालावली होती. त्यानंतर गावकऱ्यांनी त्याला रुग्णालयात भरती केले होते. ज्या वयात आई व बहिणींचे प्रेम हवे होते. रोज ज्या बहिणींशी तो हितगुज करायचा, ज्या आईच्या अंगा खांद्यावर खेळून तो मोठा झाला होता, त्यांना आपल्याच घरी एकाचवेळी रक्ताच्या थारोळ्यात गतप्राण झालेले पाहून त्याच्या मनात भीती निर्माण झाली आहे.