जळगाव मिरर | २८ ऑक्टोबर २०२५
गेल्या ३/४ दिवसा पासून रावेर तालुक्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, कापूस, ज्वारी, मका, ईतर पिकांचे नुकसान झाले, परतीच्या पावसाने शेतकरी हतबल झाला असून, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नसून, विविध बँकांचे कर्ज फेडावे कसे, असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तीन वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्यांच्या खरीप, रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी विविध बँकांचे कर्ज थकबाकी ठेवले, त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज बँक देत नाहीत, सरकार सुद्धा कर्ज माफीकडे दुर्लक्ष करीत आहे, यामुळे अवघ्या पंधरा दिवसावर येऊन ठेपलेली रब्बीची पेरणी करायची कशी, ही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे, विविध बँकांचे कर्ज फेडावे कसे, घर प्रपंचासह मुला-मुलींचे लग्नकार्य, त्यांचे शिक्षण आदी दडपणे शेतकऱ्यांना नैराश्येच्या गर्तेत लोटू लागल्याने त्यांची चिंता वाढली आहे, कर्ज कायम राहून बँकेने कर्जावरील व्याज सुरूच ठेवल्यास मुद्दल कर्जापेक्षा दुप्पट आकडा फुगत जाईल, हे व्याज शेतकऱ्यांनी कसे परत करावे हा प्रश्नच आहे.
सध्या शेतकऱ्यावर अस्मानी संकटाची मालिका सुरूच आहे, या चक्रव्युहातून बाहेर कसे निघावे हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना भेडसावत आहे, वादळ गारपीट परतीचा पाऊस व दुष्काळामुळे शेतकरी कर्ज फेडीत नाही, तर बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार काय आणि जवळ येऊन ठेपलेली रब्बीची पेरणी शेतकरी कशी करणार असा प्रश्न आहे, शेतकऱ्यांना शासनाने लवकरात लवकर भरीव मदत करावी अशी मागणी मनसेचे विकास राऊत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.



















