चाळीसगाव : कल्पेश महाले
उत्तर आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या अत्यंत महत्वाच्या मार्गावरील कन्नड घाट गेल्या १० वर्षात मृत्यूचा घाट झाला आहे. अपघात, वाहतुक कोंडी, नैसर्गिक आपत्ती यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी धोकेदायक ठरत आहे. दिवसेंदिवस घाटातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटील होत असल्याने याबाबत तिघा वकीलांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानुसार खंडपीठाने पोलीस विभागाला निर्देश दिले होते.
कन्नड (औट्रम) घाटातील अवजड वाहतुक ११ ऑगस्टपासून बंद करण्याचे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच दिले होते. या आदेशाच्या अंमलबजावणीची तयारी पोलिस प्रशासनाकडून केली असून आजपासून घाटातील अजवड वाहतुक बंद होवून न्यायालयाने सुचवलेल्या मार्गावरून वळवण्यात येणार आहे. याबाबत सकाळी महामार्ग पोलिसांनी कन्नड घाटात अवजड वाहतुक करणाऱ्या ट्रकचालकांची बैठक घेऊन न्यायालयाच्या निर्णयाची माहिती दिली. महामार्ग पोलिस, चाळीसगाव शहर वाहतूक शाखा व चाळीसगाव ग्रामीण पोलिसांकडून संयुक्तीकरित्या विविध पाईंटवर याबाबत बॅरेकटींक करून निर्णयाची अंमलबजावणी करणार आहेत. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीत अडकलेला कन्नड घाट आता मोकळा श्वास घेईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. न्यायालयाने जड वाहने, मल्टीएक्सल व्हेइकल, हेवी ट्रक, पेट्रोल, डिझेल, एलपीजी वाहून नेणारे टँकर, लक्झरी खासगी बस आदींना बंदी घातली. केवळ आणीबाणीची परिस्थितीत परवानगी घेऊन सैन्य, निमलष्करी दल, पोलिस दलाची वाहने जातील.
अवजड वाहन बंदी निर्णयाची अंमलबजावणीसाठी चाळीसगाव महामार्ग पोलिस मदत केंद्राचे एपीआय सतिष पाटील यांनी अवजड ट्रकचालक व इतर वाहनधारकांची बैठक घेऊन न्यायालयाच्या आदेशाची माहिती दिली. याबाबत महामार्गाचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, उपअधीक्षक प्रदीप नैराळे, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी न्यायालयाच्या आदेशाचे अंमलबजावणीच्या दृष्टीने आढावा घेतला व सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीष पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना सूचना दिल्या. अपर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिस व शहर वाहतूक शाखेने नियोजन केले आहे.