जळगाव मिरर | ११ ऑक्टोबर २०२५
अर्धवेळ स्त्री परिचारिकांच्या मानधनाबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे की, शासनाकडून निधीची उपलब्धता न झाल्यामुळे सप्टेंबर महिन्याचे मानधन जमा होऊ शकलेले नाही, मात्र आता निधी उपलब्ध करून देण्याची तजवीज करण्यात आली असून दिवाळीपूर्वी सप्टेंबर महिन्याचे मानधन वितरित करण्यात येईल.
तसेच, ऑक्टोबर महिन्याचे मानधनही त्याचबरोबर देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दिली. शुक्रवार, दि. १० ऑक्टोबर रोजी अर्धवेळ स्त्री परिचारिकांनी आपली मागणी मांडण्यासाठी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढला होता. या मोर्चासोबतच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा. मिनल करनवाल यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या विषयाची तातडीने दखल घेऊन संबंधित विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करून मानधन वितरणाची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील अर्धवेळ स्त्री परिचारिकांना दिलासा मिळणार असून, त्यांच्या सेवाभावाला आणि कामातील प्रेरणेला नवी ऊर्जा मिळेल, असे आरोग्य विभागाने कळविले आहे