जळगाव मिरर | २१ जुलै २०२४
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आतापासून कंबर कसली आहे. तर दुसरीकडे राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसांच्या निमित्ताने दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना एक दिवस आधीच शुभेच्छा मिळतानाच चित्र दिसून येत आहेत. अशातच अजित पवारांसाठी कार्यकर्त्यांनी आणलेल्या एका केकची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
मी अजित आशा अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की असा मजकूर असलेला हा केक अजितदादांनी कापला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी सातत्याने त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. अजित पवार हे शनिवारी पुण्यातील पिंपरी- चिंचवड दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी त्यांच्या समर्थकांनी वाढदिवसाच्या एक दिवस आधीच केक कापत त्यांचा जन्मदिवस साजरा केला. पण यावेळी चर्चा सुरू झाली ती त्यांच्या केकची. अजित पवारांसाठी आणलेल्या केकवर ‘मी अजित आशा अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…!’, असा मजकूर लिहिण्यात आला होता.