जळगाव मिरर | २४ ऑक्टोबर २०२३ | गेल्या काही वर्षभरापासून भाजपचे दिग्गज नेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांना काही नेत्यांनी अलगदपणे राज्याच्या राजकारणातून बाहेर काढत त्यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीती स्थान दिल्याने पंकजा मुंडे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातलं वैर लपून राहिलेलं नाही. तर दरवर्षी प्रमाणे दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे आपली खदखद जाहीरपणे बोलत असतात. आज देखील त्यांनी थेट राज्य सरकारवर जोरदार आसूड ओढला, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सत्तांतरावरुन त्यांनी खडे बोल सुनावले.
यावेळी पंकजा मुंडे यांनी, घराबाहेर पडण्याचा संकल्प जाहीर केला असून मी पडले परंतु इतरांना पाडण्यासाठी मी मैदानात उतरणार असल्याचं त्यांनी सांगितलं. चारित्र्यहिन, शेतकऱ्यांसोबत राजकारण करणारे, बेरोजारांचे प्रश्न न सोडवणारे आणि पैशांच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांना मी पाडणार; असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांचा रोख नेमका कुणाकडे होता आणि स्वपक्षातील उमेदवारांच्या विरोधात पंकजा मुंडे काम करणार आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यापूर्वी पंकजा मुंडेंनी परळीएवढंच पाथर्डी मतदारसंघावर प्रेम केल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे त्या पाथर्डीमधून निवडणूक लढवणार का? की निवडणूकच लढवणार नाहीत? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.