जळगाव मिरर | २१ जुलै २०२४
गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांचे आरक्षणासाठी उपोषण सुरु असतांना आता पुन्हा एकदा जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे. शनिवारी पहिल्याच दिवशी राज्यभरातील अनेक मराठा बांधव यात सहभागी झाले होते. ‘ मी जगलो तर पुढच्या दौऱ्यावर जाईन, मेलाे तर दौरे रद्द होतील. प्रसंगी रुग्णवाहिकेतून जाईन, पण दौरे करीन’, अशी भावनिक साद जरांगे यांनी घातली. विधानसभेत कुणाला पाडायचे ते २९ ऑगस्टला ठरवू. त्याआधी २८८ मतदारसंघाचा डेेटा गोळा करा, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, प्रत्येक आंदाेलनात जरांगेंशी समन्वयाची भाषा करणाऱ्या भाजप नेत्यांनी आता त्यांना थेट शिंगावर घेण्याचे ठरवले आहे. आमदार प्रवीण दरेकर यांनी जरांगेंचा भंपकपणा उघडकीस आणण्याचा इशारा दिला. त्यांच्या डोक्यात राजकारणाचे जे भूत आहे ते आम्ही उतरवू. त्यासाठी अभियान सुरू करु, असे खडे बोलही दरेकरांनी सुनावले.
मराठा समाजाने उमेदवार दिल्यास अापलाच विजय असे युतीला वाटते.तर आरक्षण दिले नाही तर मराठा समाज आपल्याला साथ देईल, असे आघाडीला वाटते. पण आपणच उमेदवार देऊ, असे जरांगे म्हणाले. २८८ मतदारसंघात समीकरण जुळले नाही तर जो मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करेल त्याच्या उमेदवाराला प्राधान्य देऊ. प्रकाश आंबेडकर पुन्हा सोबत येतील, असे जरांगे म्हणाले.