
जळगाव मिरर | ९ डिसेंबर २०२४
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वेगवेगळे आमिष देवून फसवणूक होत असल्याच्या नेहमीच घटना घडत असतांना नुकतेच जळगाव शहरातील एका व्यावसायिकाची देखील लाखो रुपयात फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. नवीन कार घेऊन देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला एकाने ३ लाख २५ हजारांचा गंडा घातला. या प्रकरणी रविवारी दुपारी व्यावसायिकाच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. विक्रम रमेश मुणोत (४२, रा. मनीषा कॉलनी) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा कॉलनीत विक्रम मुणोत हे कुटुंबासह वास्तव्यास असून, त्यांचा जाहिराती प्रदर्शित करण्याचा व्यवसाय आहे. जाहिरातीच्या कामाच्या माध्यमातून त्यांची स्वीगी कंपनीच्या जळगाव कार्यालयातील एरिया मॅनेजर राकेश सुभाष बडगुजर यांच्याशी ओळख झाली होती. नंतर दोघेही संपर्कात होते. तेव्हा बडगुजर यांनी मुणोत यांना संपर्क साधून कंपनी कोट्यातून कर्मचाऱ्यांना कमी किमतीमध्ये कार विक्री करते. त्यामुळे तुम्हाला नवीन कार घेऊन देतो असे सांगून त्यांनी मुणोत यांचा विश्वास संपादन केला. मुणोत यांनी मे महिन्यात बडगुजर याला ३ लाख २४ हजार रुपये बँकेद्वारे पाठवले. मात्र, वारंवार कारची विचारणा केल्यावर बडगुजर याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. अखेर कार खरेदी करून देण्यास नकार दिल्याने मुणोत यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी रविवारी रामानंदनगर पोलिस ठाणे गाठून राकेश सुभाष बडगुजर (४२, रा. मनोकामना निवास, पंचतारानगर, आकुर्डी, पुणे) याच्याविरुद्ध जळगावात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.