जळगाव मिरर / २४ एप्रिल २०२३ ।
गेल्या काही दिवसाआधी शहरातील तरुणाचा परिवाराने एका मुलीशी साखरपुडा झाला होता. होणाऱ्या पत्नीला व्हिडीओ कॉल करून हितेश गौतम बागडे (वय २०, रा. नाथवाडा, सिंधी कॉलनी) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. २२ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीतील नाथवाडा येथे घडली आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिंधी कॉलनीजवळील नाथवाडा येथे हितेश बागडे हा सध्या महाविद्यालयीन शिक्षण करीत होता. दोन महिन्यांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता. नेहमीप्रमाणे रात्री ९ वाजता घराच्या दुसऱ्या मजल्यावर असताना तो भावी पत्नीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होता. त्यानंतर त्याने थेट गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार हितेशची आई गुड्डी यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हंबरडा फोडला. शेजारी राहणाऱ्या तरुणांनी धाव घेऊन जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी मयत घोषित केले. हितेशने आत्महत्या का केली, याची माहिती समोर आलेली नाही. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई गुड्डी, वडील गौतम दयाराम बागडे लहान भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.