जळगाव मिरर | २ जानेवारी २०२५
गावठी पिस्तुलसह धारदार तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या मामा-भाच्यांचा पाठलाग करीत शनिपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून गावठी कट्टुयासह दोन जीवंत काडतूस व तलवार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी शाम साहेबराव सपकाळे (वय ३०, रा. असोदा रोड) व त्याचा भाचा विशाल उर्फ सोनू धनराज सोनवणे (वय २०, रा. असोदा रोड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाचे स्वागत करतांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये. म्हणून शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंगसह नाकाबंदी करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या. त्यानुसार शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील अंमलदार पोहे कॉ गिरीश पाटील, अनिल कांबळे, विकी इंगळे, गजानन वाघ, पराग दुसाने, शाम काळे हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रेकॉर्डवरील संशयित शाम साहेबराव सपकाळे हा हातात गावठी पिस्तुल घेवून दहशत माजवितांना दिसून आला. दरम्यान, पथकाने त्याचा पाठलाग करीत मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून गावठी पिस्तुलसह दोन जीवंत काडतूस जप्त करण्यात आले.
शाम सपकाळे याच्याकडून जीवंत काडतूसांसह गावठी पिस्तुल जप्त केल्यानंतर त्याचा भाचा विशाल उर्फ सोनू सोनवणे याच्याकडून धारदार तलवार जप्त करण्यात आली. त्या दोघ मामा भाच्याविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित विशाल हा आजारी असल्याने त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. अटकेतील संशयित शाम सपकाळे याला न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. तपास उपनिरीक्षक योगेश ढिकले हे करीत आहे.