जळगाव मिरर | २२ ऑक्टोबर २०२३
हरविलेल्या चावीचा गैरवापर करीत चोरट्यांनी कुटुंबियांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटातून २ लाख ३२ हजारांची रोकड व सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी महावीर नगरातील सुंदरम अपार्टमेंटमध्ये उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महावीर नगरातील सुंदरम अपार्टमेंटमध्ये हर्षा प्रमोद कुळकर्णी या कुटुंबासह वास्तव्यास असून त्या एका पतसंस्थेत वसुली अधिकारी म्हणून नोकरी करतात. त्यांचे पती देखील एका पतसंस्थेत नोकरीस असून दोघे सोबतच नोकरीच्या ठिकाणी जातात. त्यांच्या घराचा तीन चाव्या असून दोन चाव्या पती पत्नीकडे तर तिसरी चावी त्याच अपार्टमेंटमध्ये राहत असलेली त्यांची लहान बहिण वर्षा समुद्रे यांच्याकडे असते.
नेहमीप्रमाणे कुलकर्णी दाम्पत्स सकाळी ड्युटीसाठी निघाले. हर्षा कुलकर्णी यांची कांचन नगर परिसरात वसुली असल्याने दुपारच्या सुमारास त्या तेथे गेल्या होत्या. तेथून त्यांचे घर जवळच असल्याने चहा पिण्यासाठी त्या घरी गेल्या. घरी पोहचल्यानंतर त्यांना पर्समध्ये चावी मिळून न आल्याने त्यांना चावी हरविल्याचे लक्षात आले. त्यांनी आपल्या बहिणीला फोन करुन बहिणीकडून चावी मागवून घेतली. हर्षा कुलकर्णी यांनी बहिणीला फोन केला असता, त्या म्हणाल्या की, मी शाळेतून घरी येतांना तुमच्या घराचे कुलूप उघडे पाहिले. मला वाटल तू घरी आली असशील असे त्यांनी सांगितले. त्यानंतर हर्षा कुलकर्णी या घरात गेल्या. परंतु घरातील सर्व सामान सुव्यवस्थीतच होते. चहा पाणी घेतल्यानंतर कुलकर्णी या पुन्हा ड्युटीवर निघून गेल्या.
शुक्रवारी सकाळच्या सुमारास हर्षा कुलकर्णी यांनी सोन्याचे दागिने ठेवलेले कपाट उघडले असता, त्यांना लॉकरमध्ये ठेवलेले दागिने मिळून आले नाहीत. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. चोरट्यांनी कुलकर्णी यांच्या घरातून ७५ हजारांचे तीन तोळ्याचे मंगळसूत्र, १२ हजार ५०० रुपयांचे कानातले झुमके, ५० हजारांची २ तोळ्याची चैन, ५० हजारांची २ तोळ्याच्या बांगड्या व ४५ हजारांची रोकड असा एकूण २ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला.