जळगाव मिरर | १६ नोव्हेंबर २०२५
गेल्या काही दिवसापासून कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांच्या मुलीच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा आहे व या साखरपुड्याच्या सोहळ्यात मोठ्या प्रमाणात खर्च केल्यामुळे कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज टीकेचे धनी झाले.’बोलण्याप्रमाणे वागले नाहीत’ अशी टीका त्यांच्यावर होत असताना, संतप्त इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनातून या टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. साखरपुड्यापेक्षा मुलीच्या लग्नाचा ‘बार’ मोठ्या धुमधडाक्यात उडवणार असल्याचे त्यांनी टीकाकारांना ठणकावून सांगितले.
गेल्या आठवडाभरापासून सोशल मीडियावर इंदुरीकरांच्या मुलीच्या साखरपुड्याचे व्हिडिओ चर्चेत होते. आपल्या कीर्तनातून साधेपणाचे रामबाण धडे देणारे महाराज स्वतःच्या मुलीच्या सोहळ्यात लाखो रुपये खर्च करण्यावरून नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले. नेटकऱ्यांनी इंदुरीकर महाराज ‘दुटप्पीपणा’ करत असल्याचा आरोप केला. या टीकेमुळे त्रस्त झालेल्या इंदुरीकरांनी कीर्तनसेवा सोडण्याचे संकेतही दिले होते. आता या टीकेला इंदुरीकरांनी एका कीर्तनातून दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
या टीकेला उत्तर देताना इंदुरीकर महाराज प्रचंड संतापलेले दिसले. “अनेक जण माझ्या मुळावर उठणार, हे मला माहिती होते. त्या औलादींना मी सांगतो. मुलीचे लग्न याच्यापेक्षा टोलेजंग करणार आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त करत टीकाकारांना ठणकावून सांगितले. यावेळी इंदुरीकर महाराजांनी राजकारण्यांवरही टीका केली. “तीस मिनिटांच्या सभेसाठी राजकारणी तीन कोटी खर्च करतात, तेव्हा कुणी काही बोलत नाही. ते पैसे कुठून आणले? हे देखील माध्यम प्रतिनिधी त्यांना विचारीत नाही,” असे म्हणत त्यांनी निवडणुकीच्या काळात आता पैशाचा तमाशा सुरूच होईल, असे सांगितले.
हे लोक विकले गेलेले आहेत. केवळ दुसऱ्यांना त्रास देणे हेच यांचे काम राहिले आहे. दुसऱ्याला त्रास देण्यालाही मर्यादा असतात. माझ्यापर्यंत ठीक होते, परंतु लोक माझ्या कुटुंबावर बोलत आहेत. माझ्या मुलीच्या अंगावरील ड्रेसपर्यंत काही लोक गेले आहेत. आता डोक्यावरचा फेटा खाली ठेवायची वेळ आली आहे, असे इंदुरीकर महाराज म्हणालेत. दरम्यान, कीर्तनातून ‘साधी लग्न करा, कर्ज काढू नका’ असा आग्रह धरणाऱ्या महाराजांनी स्वतःच्या मुलीच्या सोहळ्यात केलेल्या खर्चावरून त्यांना ‘बोले तैसा चाले’ या उक्तीवर न वागल्यामुळे टीकेला सामोरे जावे लागले आहे. मात्र, आता इंदुरीकर महाराजांनी टीकाकारांना दिलेल्या उत्तरामुळे टीकाकाऱ्यांच्या काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहावे लागणार आहे.



















