जळगाव मिरर । ९ नोव्हेंबर २०२५
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांची कन्या ज्ञानेश्वरी हिच्या थाटात पार पडलेल्या साखरपुड्यात पैशांची उधळपट्टीमुळे इंदुरीकर यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले. ऐरवी आपल्या किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे महत्व सांगणारे इंदुरीकर महाराज मुलीच्या साखरपुड्यात पैशांची केलेल्या उधळपट्टीमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले. होणाऱ्या ट्रोलिंगला इंदुरीकर यांनी सडेतोड उत्तर दिले होते.
संगमनेर येथील एका कार्यालयात त्यांची मुलगी ज्ञानेश्वराचा मोठ्या शाही थाटात साखरपड्याचा सोहळा पार पडला. या सोहळ्यातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता सोशल मीडियावर याच सोहळ्यातील एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतून इंदुरीकर महाराज यांनी मोठा निर्णय घेतला असल्याचे सांगताना दिसत आहेत.
साधी लग्न केल्यावरही मुले होतात म्हणणारे इंदुरीकर महाराज मात्र लेकीच्या साखरपुड्यात सर्वकाही विसरल्याचे स्पष्टपणे दिसले. या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर लोकांची उपस्थित होती. काही राजकीय नेत्यांनी देखील सोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यातील व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत इंदुरीकर महाराज यांनी प्रत्येक कार्यक्रमात येणाऱ्या विशिष्ट लोकांना फेटे बांधली जातात आणि विशिष्ट लोकांनी त्यांच्याकडे पाहणे यामध्ये बदल केला असल्याचे जाहीर केले.
थोडी लोक मला नाव ठेवतील. आयुष्यातील 30 वर्षे मी लोकांनी नावे ठेवलेलीच मी सहन करत आलोय. पण आता बदल करत यापुढे ठरवले की, विशिष्ट व्यक्तीचा सत्कारच करायचा नाही. करायचा तर सर्वांचाच नाही तर एकाचाही नाही, अशी मोठी घोषणा त्यांनी या सोहळ्यात केली. म्हणून आजच्या कार्यक्रमात मी ठरवून टाकले की, येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक मुर्ती द्यायची आणि ती मुर्ती देवघरात राहिल. हा बदल आपण कार्यक्रमात केला आहे आणि सत्कार हा विषय बंद केला आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.



















