
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील चोरट्याची दहशत वाढत असल्याचे चित्र जळगावात पहायला मिळत आहे. नुकतीच मु.जे.महाविद्यालाच्या मागील बाजूस असलेल्या मुख्य रस्त्याहून जात असलेल्या तीन मुलीना पाहून भामट्यांनी भरधाव दुचाकीने येत एका मुलीच्या हातातील मोबाईल घेवून सुसाट गाडी पळवत नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी या युवतीने रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सविस्तर वृत्त असे की, पादचारी विद्यार्थिनीस जमिनीवर ढकलून देत दुचाकीवरून आलेल्या तीन भामट्यांनी तिच्या हातातला मोबाइल हिसकावून नेला. या घटनेत विद्यार्थिनी जखमी झाली आहे. ही घटना १९ सप्टेंबरला रात्री ९ वाजता एकलव्य क्रीडा संकुलाजवळ घडली.दर्शना बाळासाहेब कांबळे (वय २१, मूळ रा. मुंबई, हल्ली मु. कुसुमाई मुलींचे वसतिगृह, जळगाव) असे जखमी विद्यार्थिनीचे नाव आहे. दर्शना ही जळगावात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. १९ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास दर्शना ही मैत्रीण तेजस्विनी बेलकर हिच्या सोबत जेवण करून वसतिगृहाकडे एकलव्य संकुलाकडून पायी जात होती. त्यावेळी तिच्या मागून विना नंबरप्लेटच्या दुचाकीवरून तीन भामटे आहे. यातील मागे बसलेल्या भामट्याने दर्शनाला जमिनीवर ढकलून देत तिच्या हातातील नऊ हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून नेला. यात दर्शना ही खाली पडल्याने दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक शांताराम पाटील तपास करीत आहे.





















