जळगाव मिरर | २५ एप्रिल २०२४
भाजपने राज्यातील दोन पक्ष फोडले. त्यात जळगाव जिल्ह्यात सर्वात मोठी गद्दारी झाली. लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर या गद्दारांना महाराष्ट्रात फिरणेदेखील कठीण होऊन जाईल, अशा शब्दात खा. संजय राऊत यांनी शिंदेसेनेच्या आमदारांवर जळगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील व श्रीराम पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर सभेत टीका केली.
संजय राऊत यांनी भाजपसह थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. भाजपला महाराष्ट्र लुटायचा होता. त्यांना आम्ही विरोध केला, म्हणून आमचा पक्ष फोडला. मोदींनी ४०० पारची घोषणा केली आहे. मात्र, महाराष्ट्राची जनता, चारशे पार नाही, तर भाजपला तडिपार करणार असल्याचे राऊत म्हणाले. ज्या टपरीवाल्याला शिवसेनेने आमदारकी दिली, मंत्रीपदे दिली त्याने गद्दारी केली. आता त्यांना पुन्हा टपरीवर बसण्याची वेळ आणू, असे सांगत राऊत यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटलांवर निशाणा साधला. भाजपकडून ४०० पारची घोषणा केवळ संविधान बदलण्यासाठी केली जात असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.