जळगाव मिरर | ३१ ऑक्टोबर २०२५
जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड कंपनीच्या (३० सप्टेंबर २०२५ पर्यंत) तिमाही आणि सहामाही आर्थिक निकालांची घोषणा ३० ऑक्टोबर रोजी करण्यात आली. देशात ओला दुष्काळ असताना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिकुल परिस्थिती असताना कंपनीच्या महसूलात लक्षणीय वाढ झाली आहे. कंपनीचा महसूल २०.२ टक्के वाढला आहे. तसेच कंपनीचा नफा (EBITDA margin) मागील वर्षाच्या त्याच कालावधीच्या तुलनेत २.२७ टक्के वाढला आहे.
मागील वर्षी पहिल्या सहामाहीत एकत्रित आर्थिक निकालात कंपनीचे एकत्रित एकूण उत्पन्न २,६६९.८ कोटी रुपये होते, त्यात यंदाच्या सहामाहीत (११.५%) वाढ होऊन हे उत्पन्न २,९७८.० कोटी रुपये झाले आहे. व्याज, कर, घसारा आणि मूल्यह्रास यापूर्वीचा नफा (EBITDA) मागील वर्षी पहिल्या सहामाहीत ३१७.५ कोटी रुपये होता. त्यात यावर्षीच्या सहामाहीत (१३.५%) वाढ होऊन हा नफा ४०१.२ कोटी रुपयांवर पोहचला आहे. कंपनीचा कर भरल्या नंतरचा नफा (Cash PAT) यंदा (५.५%) चांगलाच वाढला आहे. हा नफा १६४.९ कोटी रुपये झाला आहे. मागील वर्षी हा नफा १२१.८ कोटी रुपये होता.
दुसऱ्या सहामाहीत मागणी वाढणार- अनिल जैन
निकालाबाबत कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन म्हणाले, “कंपनीने दुसऱ्या तिमाहीत (Q2FY26) स्वतंत्र आणि एकत्रित पातळीवर चांगले आर्थिक निकाल साध्य केले आहेत. एकत्रित महसूलात २०.२ टक्के वाढ झाली आहे. तसेच (व्याज, कर, घसारा आणि अमॉर्टायझेशन पूर्वीची कमाई) EBITDA मार्जिनमध्ये वार्षिक तुलनेत २२७ बेसिस पॉइंट्सची सुधारणा झाली आहे. यंदा देशातील सर्व प्रमुख राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडूनही आणि आंतरराष्ट्रीय बाजारात विपरित परिस्थिती असताना हे सर्व साध्य झाले आहे. अतिवृष्टी आणि अवेळी पावसामुळे यंदा खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणे ही चिंतेची बाब आहे. सरकारकडून इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील खर्चात मोठी घट झाल्यामुळे पाईपिंग विभागातील मागणी कमी झाली आहे. परंतु निर्यातीत वाढ झाली आहे. देशांतर्गत सौर कृषी पंप विभागात चांगली मागणी आहे. तसेच आंतरराष्ट्रीय फूड आणि प्लास्टिक व्यवसायात वाढ नोंदवली गेली आहे. कंपनीचा महसूल वाढला असून नफ्यातही लक्षणीय वाढ दिसून आली आहे. कंपनीने त्यांच्या फूड प्रोसेसिंग व्यवसायात बॉटलिंग प्लँट टाकण्याची सुरुवात एका मोठ्या कंपनीबरोबर सुरु केली आहे. त्याचा फायदा कंपनीला अधिक विक्री, नफा आणि वाढीसाठी होईल,” असे अनिल जैन यांनी म्हटले. भविष्यातील संधीबाबत ते म्हणाले, देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील मध्यम आणि दीर्घकालीन संधींबद्दल आम्ही आशावादी आहोत. केंद्र सरकारने जीएसटीच्या दरात केलेल्या कपातीमुळे आणि देशांतर्गत चांगल्या पावसामुळे आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत मागणीत वाढ होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
जैन इरिगेशन कंपनीविषयी
जैन इरिगेशन सह उपकंपन्या मायक्रो इरिगेशन सिस्टिम्स, पीव्हीसी पाईप्स, एचडीपीई पाईप्स, प्लास्टिक शीट्स, कृषी प्रक्रिया उत्पादने, सौर ऊर्जा, टिश्यू कल्चर आणि इतर कृषी संबंधित उत्पादनांच्या निर्मितीमध्ये कार्यरत आहेत.
कल्पना कणापरी ब्रम्हांडाचा भेद करी ‘Small Ideas, Big Revolutions’ हे जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड कंपनीचे ब्रीदवाक्य आहे. १०,००० हून अधिक सहकाऱ्यांसह आणि ५७.८ अब्ज रुपयांच्या उत्पन्नासह कार्यरत असलेली एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे.
कंपनीने आधुनिक सिंचन प्रणाली आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अमूल्य पाण्याची बचत करत क्रांती घडवली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. तसेच कंपनीने मोठ्या प्रमाणात एकत्रित सिंचन प्रकल्प (Integrated Irrigation Projects) या नव्या संकल्पनेचीही सुरुवात केली आहे. ‘More Crop Per Drop’ ही कंपनीची पाणी आणि अन्नसुरक्षेप्रतीची दृष्टी आहे.

 
			


















