जळगाव मिरर | २७ ऑक्टोबर २०२६
वाढती पाणीटंचाई आणि भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘जलदूत’ बनून जलसंवर्धनाचा जागर सुरू केला आहे. गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेअंतर्गत जळगावातील निवडक वसाहतींमध्ये गृहभेटी देऊन पाणी वापर, बचतीच्या सवयी, स्वच्छता आणि पावसाच्या पाण्याच्या संकलनाबाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे.

सर्वेक्षणाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पाण्याचा अपव्यय टाळणे, नळांची गळती दुरुस्त करणे, गरजेपुरते पाणी वापरणे आणि पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्याचे महत्त्व रुजविले जात आहे. सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पुढील जनजागृती करण्यात येणार आहे. सोशल मीडियाद्वारेही पाणी बचत आणि भूजल पुनर्भरणाचे संदेश प्रसारित केले जात आहेत.
अनुभुती इंग्लिश मिडीयम स्कुल च्या प्राचार्या रश्मी लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली, गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेचे समन्वयक राजेंद्र बावस्कर यांच्या नियोजनातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची संकल्पना व निर्मिती शिक्षिका गीतांजली काळे यांची आहे.
‘पाणी वाचवा, पाणी अडवा आणि पाणी जिरवा’ हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवून नागरिकांना जलसंवर्धनात सहभागी करून घेणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.




















