
जळगाव मिरर । २३ नोव्हेंबर २०२५
माजी महापौर ललित कोल्हे यांच्या ममुराबाद रस्त्यावरील फार्म हाऊसवर सुरू असलेलेल बोगस कॉल सेंटर हाताळणारे संशयित आदील सैयद निशार अहमद सैयद (३२, रा. ओशिवरा, मुंबई) व अकबर खान रौनक अली खान (४०, रा. मालाड पूर्व मकराणी पाडा, मुंबई) या दोघांच्या एलसीबीसह डीवायएसपींच्या संयुक्त पथकाने मुंबई येथून मुसक्या आवळल्या आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या आता १० झाली असुन फरार संशयिताचा कसुन शोध घेतला जात आहे. या दोघांच्या अटकेमुळे प्रकरणाचे धागेदोरे उलगडणार आहे.
सविस्तर वृत्त असे की , येथील ममुराबाद रस्त्यावर माजी महापौर ललित कोल्हे यांच्या एल.के. फार्म हाऊसवर बोगस कॉल सेंटर सुरू होते. वेगवेगळे अमिष दाखवून विदेशातील पोलिसांनी छापा टाकला होता. यामध्ये माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल होऊन आठ जणांना अटक करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखा व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मुंबईतून एका फ्लॅटमधून शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) रात्री आदील सैयद निशार, अकबर खान या दोघांना अटक केले. हे दोघेही घरी न राहता जागा बदलवून वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते. आता ऋषी उर्फ केशव राजू बेरिया (सर्व रा. मुंबई) याला अटक होणे बाकी आहे. आदील व अकबर या दोघांना शनिवारी (२२ नोव्हेंबर) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी तथा तपासाधिकारी नितीन गणापुरे यांनी युक्तीवाद केला. या पूर्वी अटक केलेल्या इम्रानला एक लाख रुपये दिल्याचे त्याने चौकशीदरम्यान सांगितले. त्याला ही रक्कम कशी दिली, कॉल केल्यानंतर समोरील व्यक्तीशी बोलण्याची स्क्रिप्ट कशी व कोठून मिळविली, आंतरराष्ट्रीय रॅकेट कसे काम करायचे, दोघांची ललित कोल्हेंशी ओळख कशी झाली याची माहिती घ्यायची असल्याचे न्यायालयासमोर सांगून गणापुरे यांनी पोलिस कोठडीची मागणी केली.
हे कॉल सेंटर हाताळणारे दोघे अटक झाल्याने फसवणुकीची रक्कम कोणाच्या बँक खात्यावर स्वीकारली जात होती, यासह विदेशात त्यांचे हस्तक कोण आहे याचीही माहिती समोर येऊ शकते. विदेशातील नागरिकांना फसविण्याची कार्यपद्धती कशी होती, ही महत्त्वाची माहिती समजण्यासह इतरही केंद्रांमार्फत फसवणूक केली आहे का, हेदेखील स्पष्ट होऊ शकणार आहे. अटक केलेल्या आदील याच्यावर या पूर्वीही मुंबईत आयटी अॅक्टनुसार तर अकबर याच्यासह दंगल व इतर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.




















