जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२६
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच सणाच्या काळात शांततेला बाधा आणणाऱ्या समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलिस दलाने धडक कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी (७ सप्टेंबर) एकाच दिवसात जिल्ह्यातील पोलिसांच्या रेकॉर्डवरील १४ जणांना हद्दपार करण्यात आले. यापैकी काहींना सहा महिने, तर काहींना एक वर्षासाठी जिल्ह्याबाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या हद्दपारीचे आदेश प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी काढले आहेत. गणेशोत्सवाच्या काळात शांतता भंग होण्याची शक्यता असलेल्या तसेच वारंवार गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
हद्दपार करण्यात आलेल्या १४ जणांमध्ये नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सहा, जामनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन, तर रामानंदनगर, जिल्हापेठ आणि फत्तेपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
एक वर्षासाठी हद्दपार केलेल्यांमध्ये अरमान चिंधा पटेल, अक्रम शहा सादीक शहा, हरी पांडुरंग पाटील, विपुल गोविंदा नाथ, आवेश खान उर्फ काल्या शेख जहांगिर, मुक्तार शेहा खलील शहा, आताल्लाह शाह अमानल्लाह शाह आणि चेतन उर्फ बटाट्या रमेश सुशीर यांचा समावेश आहे.
तर सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये जगन्नाथ रामकृष्ण कोळी, प्रकाश सुभाष शिंदे आणि सोपान अशोक इंगळे यांचा समावेश आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मिरवणुका, सार्वजनिक कार्यक्रम आणि गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाईला वेग देण्यात आला आहे. आगामी काळातही पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवून आवश्यकतेनुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




















