जळगाव मिरर | २४ नोव्हेंबर २०२५
जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा तरुणाच्या खुनाची बातमी समोर आली आहे. मुक्ताईनगर शहरात रविवारी २३ नोव्हेंबर सायंकाळच्या सुमारास एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. शहरातील हॉटेल वृंदावन समोरील प्लॉटिंग भागात एका मोकळ्या जागेत हा मृतदेह मिळून आला. सदर तरुणाचा चाकू भोसकून निर्घणपणे खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही हत्या प्रकरण प्रेमसंबंधातून घडले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विष्णू गोसावी (वय २६, रा. मुक्ताईनगर) असे मयत तरुणाचं नाव असून, तो गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होता. रविवारी २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास काही नागरिकांना प्लॉटिंगच्या ठिकाणी हा मृतदेह दिसला, त्यानंतर त्यांनी तात्काळ मुक्ताईनगर पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काही तरुणांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी पंचनामा केला आणि मृतदेह पुढील तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. मृतदेहाची स्थिती आणि घटनास्थळावरून हा खून असल्याचे स्पष्ट होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेमागे प्रेम प्रकरणातून निर्माण झालेल्या वादाचा किंवा सूडाचा संबंध असण्याची दाट शक्यता आहे. या दृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असून, विष्णू गोसावी याचे कोणासोबत प्रेमसंबंध होते आणि तो बेपत्ता झाल्यानंतर कोणत्या व्यक्तींच्या संपर्कात होता, याची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे मुक्ताईनगर शहरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. रात्री उशिरापर्यंत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलीस तपासात आरोपी म्हणून ऋषिकेश आत्माराम पवार (धनगर) आणि आकाश आत्माराम पवार (धनगर) या सख्या भावांना ताब्यात घेण्यात आले. आकाश पवारचा एका तरुणीसोबत साखरपुडा झाला असून त्या तरुणीचे विशाल गोसावीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आकाशला होता. या संशयातून दोघा भावांनी कट रचून विशालला दारू पाजली, त्यानंतर बोदवड रस्त्यावरील बंद पडलेल्या उद्यानात नेऊन चाकूने भोसकून हत्या केली, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा भावांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.




















