
जळगाव मिरर | ५ एप्रिल २०२५
शहरातील प्रभाग क्र.१ मधील सुरेश कलेक्शन ते मारोती चौक या मुख्य ८० फुटी रस्त्यावर गेल्या महिन्यात सिमेंटचे रस्ते बनविले होते. या ठेकेदाराने बनविलेले रस्ते चक्क एक महिन्यात खराब झाले असल्याचे दिसून आल्यानंतर ‘जळगाव मिरर’ ने दि.१ एप्रिल रोजी याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर लागलीच दुसऱ्यादिवशी अधिकाऱ्यांनी पाहणी करीत ठेकेदाराला दम भरला होता त्यानंतर या रस्त्याला तात्पुरत्या स्वरूपात ‘मलम’ लावण्यात आला आहे.
जळगाव शहरातील प्रभाग क्र.१ दुध फेडरेशन परिसरातील नवीन उड्डाणपुलाजवळील सुरेश कलेक्शन ते मारोती चौकच्या ८० फुटी रस्ता ठेकेदाराने फेब्रुवारी – मार्च महिन्यात सिमेंटचा बनविला होता. मात्र मार्च महिन्याच्या अखेरीस हा रस्ता सिमेंट बाहेर येवून रस्त्ता खराब झाला होता. यावर सातत्याने परिसरातील नागरिकांनी अधिकाऱ्यांना तक्रारी करून देखील रस्त्याचे काम उत्तर दर्जाचे होत नव्हते तर दुसरीकडे रस्त्याला तळे जावून काही ठिकाणी खराब देखील झाला होता. यावर ‘जळगाव मिरर’ ने वृत्त प्रकाशीत करून अधिकाऱ्यांच्या कानउघडणी केल्यानंतर मनपाचे अधिकारी रंधे यांनी पाहणी करून ठेकेदाराला फुसका दम भरला व त्यानंतर ठेकेदाराने केवळ ‘मलम’ लावून नागरिकांना तूर्त दिलासा दिला आहे.
मनपाचे अधिकारी झाले ठेकेदाराचे गुलाम ?
जळगाव मनपातील अधिकाऱ्यांना सरकार पगार देत असते, मात्र याच मनपातील काही निवळक अधिकारी आपल्या पदाचा दुरुपयोग करून ठेकेदारांचे गुलाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. या अधिकारयांचा ठेकेदारावर जो धाक असायला हवा तो कदापि दिसून येत नाही. तर ठेकेदाराला ‘साहेब साहेब, म्हणून बोलून दर्जा देत असल्याने हे अधिकारी ठेकेदाराचे गुलाम झाल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.





















