जळगाव मिरर | १६ नोव्हेंबर २०२५
जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. मात्र अनेक पक्षात राजकीय नेत्यांचे मोठे-लहान बंधू किंवा परिवारातील सदस्य मोठ्या प्रमाणात यंदाच्या निवडणुकीत दिसणार आहे. त्यामुळे एकनिष्ठ कार्यकर्त्यांना यंदा देखील प्रचाराची धुराच हाती घ्यावी लागणार असल्याची जोरदार चर्चा जळगाव शहराच्या राजकारणात सुरू झाली आहे.
जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून नुकतेच आरक्षण जाहीर झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आपले मोठे – लहान बंधू किंवा परिवारातील काही सदस्यांना यंदाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे. जे उमेदवार आजवर कधीही पक्षाच्या कुठल्याही आंदोलनात कार्यक्रमात किंवा कुठेही नव्हते त्यांना देखील आता उमेदवारीचा मोह आवरता येत नाही आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्ते नेहमीच आंदोलनात अग्रेसर असलेले व पक्षातील कार्यक्रमांना भरगच्च गर्दी करणारे आज त्याच कार्यकर्त्यांना नेतेमंडळींकडून डावलण्यात येऊन त्यांना यंदाच्या मनपा निवडणुकीत त्या उमेदवारांचा प्रचाराची धुरा हाती घ्यावी लागणार आहे.
बंद केबिनमधील कार्यरत तरुण उतरणार निवडणुकीच्या मैदानाच्या रिंगणात !
महानगरपालिकेची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसे तसे मोठ्या पक्षातील अनेक राजकीय नेत्यांचे बंधू जे नेहमीच आपला व्यवसाय उद्योग मोठ्या प्रमाणात वाढवत असता त्यांना यंदा सामाजिक कार्याची जाण होऊ लागली आहे. त्यांच्या या जाणिवेमुळे पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे.
पैश्यांच्या जीवावर सर्वसाधारण कार्यकर्त्यांचे राजकारण पाण्यात…
जळगाव मनपात यंदाच्या निवडणुकीत अनेक इच्छुक उमेदवार आहे. त्यातल्या त्यात सर्वच पक्षातील नेते मंडळींचे लहान-मोठे बंधू देखील पक्षात आता सक्रीय झाले आहे. जे बंधू गेल्या अनेक वर्षापासून आपल्या उद्योगाला मोठे करण्यात गेले त्यांना आता समाजाचे हित लक्षात येवू लागले आहे. त्यासोबत या राजकीय नेत्याजवळ असलेल्या अमाप पैश्याच्या जीवावर सर्वसाधारण कार्यकर्त्याचे राजकारण यंदा पाण्यात जाण्याच्या तयारीत आहे.



















