जळगाव मिरर । संदीप महाले
जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. मात्र गेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत जळगावकर नागरिकांनी भाजपला एक हाती सत्ता दिली होती. मात्र भाजपामध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात होऊन ठाकरेंची सत्ता स्थापन झाली होती. आता भाजप पुन्हा त्याच बंडखोरांचा यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत देखील प्रचार करणार का ? अशी चर्चा जळगाव शहरात सुरू झाली आहे.
जळगाव महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून भाजप व शिंदेंच्या शिवसेनेच्या पक्षातर्फे उमेदवारांची चाचणी व मुलाखती देखील सुरू झाल्या आहे. तर यंदा देखील जळगाव मनपात युती होण्याची मोठी शक्यता आहे, मात्र सन 2017 मध्ये जळगाव महानगरपालिका निवडणुकीमध्ये जळगावकर नागरिकांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर विश्वास ठेवून भाजपला एक हाती सत्ता दिली होती. मात्र भाजपने उभे केलेले निष्ठावतांना डावलून नव्या चेहऱ्याना संधी दिली व जळगावकरांनी त्यांना पसंती देखील दिली मात्र याच नव्या चेहऱ्यांनी अडीच वर्षात बंडखोरी करून भाजपशी दगाबाजी केली होती. त्यामुळे भाजपला अडीच वर्षानंतर सत्तेपासून वंचित ठेवून ठाकरे गटाची सत्ता जळगाव मनपात आली होती. आता पुन्हा महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून पुन्हा एकदा भाजपची सत्ता उलथवून टाकणाऱ्या त्या बंडखोर उमेदवारांचा यंदा देखील भाजप प्रचार करणार का ? असा प्रश्न जळगाव शहरातील नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे. त्यामुळे भाजप शिंदे गटाची होणाऱ्या युतीची जरी मोठी चर्चा होत असली तरी भाजप एकनिष्ठ व भाजपवर विश्वास असलेल्या मतदारांना यंदा देखील कुणावर विश्वास ठेवावा हा मोठा संभ्रम व्यक्त होत आहे.





















