जळगाव मिरर | २५ जुलै २०२६
जळगाव जिल्हयातून शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे वैयक्तीक मान्यतेची कोणतेही प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात प्राप्त नसतांना २५९ बनावट वैयक्तीक मान्यता प्रदान केल्या प्रकरणी बनावट शालार्थ आदेशाच्या आधारे शासनाची आर्थिक फसवणुक केल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेले जि. पचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत भाउराव हिंगोणेकर यांना धुळे येथून अटक करण्यात आल्याने शिक्षण वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

बनावट शालार्थ आयडीच्या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणाच्या तपासाला गती देण्यात आली असुन रडारवर असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचा फास आवळला जात आहे. तपासा अंती एक एक बाबीची उकल होत असुन या प्रकरणी आता जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगाणेकरांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा परिषद येथे शिक्षणाधिकारी म्हणून असलेल्या शशिकांत हिंगोणेकरांनी सन २०११ ते २०१५ या कालावधीत जळगाव जिल्हयातील एकुण २५९ शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांचे वैयक्तीक मान्यतेची कोणतेही प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात प्राप्त नसतांना बनावट वैयक्तीक मान्यता प्रदान केलेल्या आहेत असे तपासात निष्पन्न झाले आहे. माहितीवरून व तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे आरोपी शशिकांत भाउराव हिंगोणीकर हा धुळे येथे असल्याची माहिती प्राप्त झाल्याने तपास अधिकारी सहाय्यक पोलिस आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सपोउपनि मनोहर शिंदे, सपोउपनि नंदकुमार नांदुळीकर, पोहवा चंद्रकांत गवळी, पोअ तेजस मते, सुनिल खैरणार, यांनी धुळे येथे जावुन शोध घेतला असता आरोपी शशिकांत हिंगोणीकर हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेवून नाशिकरोड पोलीस ठाणे येथे आणण्यात आले.
नाशिक उपसंचालक कार्यालय या विभागाअंतर्गत येणाऱ्या नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार येथील ८४१ शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी यांचे कोणतेही वैयक्तीक मान्यता व शालार्थ प्रस्ताव नसतांना मागील तारखेच्या नियुकया दाखवुन बनावट शालार्थ आदेशाव्या आधारे शालार्थ प्रणालीत शालार्थ ड्राफ्ट भरुन घेवून वेतन व थकबाकी रक्कम प्राप्त करून घेवुन शासनाची १६० कोटींची आर्थिक फसवणुक केली आहे. संबंधित मुख्याध्यापक, संस्थाचालक, तत्का, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन अधिक्षक व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचे तपासात अद्याप पावेतो सुमारे १२०० आरोपी निष्पन्न झाले आहेत.




















