जळगाव मिरर | २७ जानेवारी २०२४
गेल्या पाच महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन सुरु केले होते. सरकारने मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाशी संबंधित सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाची यशस्वी सांगता झाली आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंबंधी वाशीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी जरांगे यांना ज्यूस पाजून त्यांचे उपोषण सोडवले. यावेळी भाजप व शिंदे यांच्या शिवसेनेचे अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचा एकही नेता यावेळी उपस्थित नव्हता. याविषयी राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर शुक्रवारी रात्रभर मनोज जरांगे व सरकारमध्ये वाटाघाटी झाल्या. त्यानंतर त्यांच्यात मतैक्य झाले. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः नवी मुंबईतील वाशीत जाऊन जरांगे यांचे उपोषण सोडवले. त्यांना गुलाल लावला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या गटाचे नेते मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. तसेच भाजपकडून मंत्री गिरीश महाजन व मंगल प्रभात लोढा हजर होते. पण यावेळी अजित पवार यांच्या गटाचा एकही मंत्री उपस्थित नव्हता.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनस्थळावरील या गैरहजेरीविषयी अजित पवार किंवा त्यांच्या गटाच्या एकाही नेत्याने अद्याप आपली प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेषतः 3 पक्षांच्या सरकारमधील एका पक्षाने एवढ्या मोठ्या महत्त्वाच्या प्रसंगी का दांडी मारली? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. राजकीय सूत्रांनी अजित पवार गटाची अनुपस्थिती अत्यंत खटकणारी असल्याचा दावा केला आहे. तसेच पुढील काही दिवसांत याचे खरे कारण जनतेपुढे येईल, असेही स्पष्ट केले आहे.