जळगाव मिरर | १ नोव्हेंबर २०२५
भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकासाचे शिखर गाठतो आहे. भारतीयांच्या जीवनात प्रगतीचे नवे दार उघडावे यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागांच्या वतीने चालविणाऱ्या योजना व उपक्रमांची जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना माहिती व्हावी यासाठी खास प्रगतीशिल महाराष्ट्र २०२५ या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. ३ ते बुधवार दि. ५ नोव्हेंबर दरम्यान जळगावच्या शिवतीर्थ-जीएस ग्राऊंडवर रंगणाऱ्या या आगळ्यावेगळ्या प्रदर्शनाला जळगावकरांनी भेट द्यावी, असे आवाहन लोकप्रिय खासदार स्मिताताई वाघ व आमदार राजूमामा भोळे व दिल्लीतील फ्रेंड्ज एक्झिबिशनच्या अखिला श्रीनिवासन यांनी केले आहे. शनिवार दि. १ नोव्हेंबर रोजी येथील हॉटेल सिल्व्हर पॅलेस येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हे मान्यवर बोलत होते.
दिल्ली येथील फ्रेंड्ज एक्झीबिशन अँड प्रमोशन या संस्थेंने केंद्र सरकारची जनजागरण मोहीम राबविताना या प्रदर्शनाला मूर्त रूप दिले आहे. ‘एक उन्नत राष्ट्र की और..’ असे घोषवाक्य घेऊन भरविण्यात आलेले हे प्रदर्शन तीनही दिवस सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच या कालावधीत सर्व नागरिकांसाठी पाहायला खुले असणार आहे. या प्रदर्शनाचे दि. ३ नोव्हेंबर रोजी अकरा वाजता जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. गिरीशभाऊ महाजन साहेब यांच्या हस्ते व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबरावजी पाटील, केंद्रीय युवा व्यवहार व क्रिडा राज्यमंत्री मा. रक्षाताई खडसे, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. श्री. संजयजी सावकारे, आमदार राजूमामा भोळे, मंगेशदादा चव्हाण, अनिलजी पाटील, किशोरजी आप्पा पाटील, अमोलदादा पाटील, चंद्रकांतदादा सोनवणे, चंद्रकांतदादा पाटील व अमोलजी जावळे आदींच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.
प्रदर्शनाबाबत माहिती देताना खासदार स्मिताताई वाघ पुढे म्हणाल्या की, या प्रदर्शनात केंद्र -राज्यातील विविध विभागांच्या वतीने चालविणाऱ्या जाणाऱ्या जनकल्याणकारी योजनांबाबत माहिती देणारे स्टॉल्स असणार आहेत. यामध्ये कृषी आणि ग्रामीण विकास, जिऑलॉजिकल सन्व्हे ऑफ इंडिया, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, जैव सुरक्षा, आयुष, होमियोपॅथी अनुसंधान परिषद, केंद्रीय मत्स पालन विभाग, महाऊर्जा, भारतीय मानक ब्युरो, आयसीएमआर, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, नॅशनल फर्लीलायजर लिमिटेड, भारतीय लघु उद्योग विकास बँक, इंडियन फार्मस फर्टिलायजर को आपरेटीव्ह लिमीटेड, गुजरात इफॉर्मेटिक्स लिमीटेड, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, न्यू इंडिया इन्शुरन्स, केंद्रीय गोदाम निगम, भारतीय समुद्री विश्वविद्यालय, केंद्रीय पेट्रोकेमिकल्स, भारतीय चहा बोर्ड, कृषी अधिकार सुरक्षा प्राधिकरण, भारतीय विमान प्राधिकरण, राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास मंडळ, कर्नाटक सोप्स एंड डिटर्जेंटस् लिमीटेड, महाराष्ट्र बांबू, ओडीसा बांबू, आधार, जळगाव महापालिका, जळगाव जिल्हा परिषद, जळगाव जिल्हा प्रशासन, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ-इनक्युबेशन सेंटर अशा विविध खात्यांचे, विभागांचे व संस्थांचे स्टॉल्स असणार आहेत.
अशा पध्दतीचे प्रदर्शन जळगाव शहरात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आले असून जळगावकरांसाठी ही खरीखुरी पर्वणी आहे. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या त्रयींचा सुरेख संगम असलेल्या या प्रदर्शनाचा जळगावाशियांनी प्रत्यक्ष भेट देऊन सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले. या पत्रकार परिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष (जळगाव महानगर) मा. श्री. दिपक सूर्यवंशी व भाजपा जिल्हाध्यक्ष (पश्चिम) मा. डॉ. राधेश्याम चौधरी, फ्रेंड्ज एक्झीबिशनच्या संचालिका तथा प्रोजेक्ट हेड अखिला श्रीनिवासन, संचालक आनंद पाल, दीपकसिंग मेहता, साक्षी सैनी आदी मान्यवर उपस्थित होते.
शालेय-महाविद्यालयीन मुलांना प्रदर्शनात संधी
या ऐतिहासिक प्रदर्शनाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयातील मुलांनाही सहभागी होता यावे म्हणून शोध प्रकल्प स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील जवळपास आठ शाळा आणि कॉलेजच्या मुलांचे प्रकल्प प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. नव्या पिढीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील कल्पक प्रयोगामधील विजेत्यांना स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.



















