जळगाव मिरर / ९ एप्रिल २०२३
अखेरच्या षटकात लागोपाठ पाच षटकार लगावत रिंकू सिंह याने कोलकात्याला थरारक विजय मिळवून दिला. वेंकटेश अय्यर याने विस्फोटक अर्धशतक झळकावत इम्पॅक्ट पाडला होता, त्यानंतर अखेरच्या षटकात रिंकूने सलग पाच षटकार लगावत कोलकात्याला विजय मिळवून दिला. कोलकात्याचा हा सलग दुसरा विजय होय.. तर गुजरातचा यंदाच्या स्पर्धेतील पहिला विजय होय. गुजरातने दिलेले 205 धावांचे आव्हान कोलकात्याने अखेरच्या चेंडूवर पूर्ण केले. गुजरातकडून कर्णधार राशिद खान याने हॅट्ट्रिक घेतली.
गुजरातचे 205 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरूवात खराब झाली. रेहमनुल्ला गुरबाज 15 तर एस जगदीशन 5 धावांची भर घालून परतला. मात्र त्यानंतर व्यंकटेश अय्यर आणि कर्णधार नितीश राणा यांनी केकेआरचा डाव सावरत संघाला 10 षटकात 86 धावांपर्यंत पोहचवले.
अर्धशतकानंतर अय्यरने आपल्या आक्रमकतेची धार अजूनच वाढवली. त्याने 40 चेंडूत 83 धावांची दमदार खेळी केली. त्याला साथ देणारा नितीश राणा 29 चेंडूत 45 धावा करून बाद झाला. मात्र अय्यरने संघाला 150 धावांचा टप्पा ओलांडून दिला. अय्यरने गुजरातचा बीपी वाढवला होता. मात्र नितीश राणाला बाद करणाऱ्या अल्झारी जोसेफने अय्यरचा अडसर दूर केला. पाठोपाठ कर्णधार राशिद खानने 17 व्या षटकात पहिल्या चेंडूवर आंद्रे रसेल, दुसऱ्या चेंडूवर सुनिल नरेन आणि तिसऱ्या चेंडूवर शार्दुल ठाकूरला बाद करत हॅट्ट्रिकसह केकेआरचे पॉवर हाऊस निकामी केले. राशिदच्या या स्पेलमुळे केकेआरची सामन्यावरील पकड निसटली. मात्र शेवटच्या षटकात रिंकू सिंहने झुंजार वृत्ती दाखवत 29 धावांची गरज असताना यश दयालच्या शेवटच्या षटकात सलग तीन षटकार ठोकत राशिदचे टेन्शन वाढवले. केकेआरला विजयासाठी 2 चेंडूत 10 धावांची गरज असताना रिंकूने शेवटच्या दोन्ही चेंडूवर यश दयालला दोन षटकार ठोकून सामना जिंकून दिला.