
जळगाव मिरर | २० एप्रिल २०२६
जळगाव जिल्ह्यात काही समाजकंटकांकडून बेकायदेशीर अग्निशस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे तसेच इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अशा गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, उमर्टी गावाकडून कृष्णापूर–मामलदे मार्गे चोपड्याकडे दोन इसम मोटारसायकलवरून विनापरवाना पिस्तूल घेऊन येत आहेत.
मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी सापळा रचत उमर्टीहून येणारी संशयित हिरोहोंडा मोटारसायकल (क्र. MH-19-9-9450) अडवली. त्यावर असलेल्या दोन इसमांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे राहुल कुवरसिंग पावरा (वय २२, रा. उमर्टी, ता. चोपडा) आणि गणपत प्रभाकर किर्तने (वय २८, रा. असोला जवळ बाजार, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) अशी सांगितली. पंचांसमक्ष करण्यात आलेल्या अंगझडतीत आरोपींकडून १ गावठी पिस्तूल, ५ जिवंत काडतुसे, संबंधित मोटारसायकल व २ मोबाईल फोन असा सुमारे ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोलीस हवालदार विष्णू बिन्हाडे, दिपक माळी, रवींद्र पाटील, विलेश सोनवणे आणि पोलीस अंमलदार रावसाहेब पाटील यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.





















