जळगाव मिरर | १७ मे २०२५
दोन ते तीन दिवसांपासून सासूरवाडीला आलेल्या शरद रामा भील (वय ४१, रा. कामतवाडी, ता. अमळनेर) यांच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास एरंडोल तालुक्यातील श्री. सुकेश्वर देवस्थान येथे घडली. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सर्वत्र वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट होवून अवकाळी पाऊस झाला. दरम्यान, एरंडोल तालुक्यातील व म्हसावद येथून जवळ असलेल्या श्री. सुकेश्वर देवस्थान येथे आज दि.१६ मे रोजी दुपारच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील कमतवाडी येथील रहिवासी शरद रामा भिल (वय ४१) हे गेल्या दोन ते तीन दिवसापासून खर्ची खुर्द येथे सासरे शंकर श्रावण ठाकरे यांच्या घरी परिवारासह आले होते. दुपारच्या सुमारास शरद भील हैं सुकेश्वर मंदिर परिसरात राहत असलेल्या मोठे सासरे देविदास ठाकरे यांच्या घरी भेटण्यासाठी आलेले होते. अचानक विज कोसळुन शरद भिल यांचा दुर्देवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती खर्ची खुर्द पोलीस पाटील यांनी एरंडोल पोलिस स्टेशन येथे कळविली. या घटनेची माहिती मिळताच. एरंडोल पोलिस ठाण्याचे सफौ महेंद्रसिंग पाटील व पोहेकॉ राजेश पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह रुग्णालयात दाखल केला असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





















