
जळगाव मिरर | 20 एप्रिल 2026
शहरातील छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलाजवळील आयुक्त निवासस्थानासमोरील मुख्य रस्त्यावर असलेल्या धोकादायक खड्ड्यामुळे एका चिमुकलीचा अपघात होण्याचा धक्कादायक प्रकार नुकताच घडला. सुदैवाने प्रसंगावधान राखत एका नागरिकाने तत्परतेने मदत केल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र या घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज नगर ते दूध फेडरेशन दरम्यानच्या रस्त्यावर, आयुक्त निवासस्थानासमोर मुख्य मार्गावर मोठा खड्डा निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी एक कुटुंब आपल्या दोन मुलांसह घरी जात असताना अंधारामुळे हा खड्डा त्यांच्या लक्षात आला नाही. यावेळी त्यांच्यासोबत असलेली एक लहान मुलगी अचानक त्या खड्ड्यात पडली.
या घटनेदरम्यान तेथून जात असलेले विनोद निंबाळकर यांनी तत्काळ धाव घेत मुलीला बाहेर काढले. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य गंभीर अपघात टळला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, या ठिकाणी वारंवार अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, महापालिका प्रशासनाने तात्काळ खड्डा बुजवून योग्य ती उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. तसेच रात्रीच्या वेळी रस्त्यांवर प्रकाशव्यवस्था सुधारण्याचीही गरज व्यक्त केली जात आहे. एकीकडे शहर विकासाच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात असताना, दुसरीकडे अशा धोकादायक परिस्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.






















