अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर तालुक्यातील डांगरी येथे नापिकीमुळे वृद्ध शेतकऱ्याने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना २० रोजी घडली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील प्र. डांगरी येथील अशोक बाबुराव बोरसे (वय ६१) हे घरी एकटे असताना त्यांनी घराच्या छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्यावेळी त्यांची पत्नी व मुलगा शेतीच्या कामासाठी गेले होते. दुपारी २ वाजता मुलगा कामावरून घरी आला असता दरवाजा बंद असल्याने त्याने खिडकीतून डोकावून पाहिले असता, ही घटना उघडकीस आली. अशोक बोरसे यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मुलाच्या माहितीवरून मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.ना. मुकेश साळुंखे करत आहेत. दुष्काळ आणि नापिकीमुळे ते काही दिवसापासून नैराश्यात असल्याची माहिती, या वेळी देण्यात आली.