जळगाव मिरर | २५ फेब्रुवारी २०२५
देशातील अनेक ठिकाणी प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून हाणामारी व खुनाच्या घटना सातत्याने घडत असतांना एक धक्कादायक प्रकरण आता केरळ राज्यातून समोर आले आहे. तिरुअनंतपुरममधील वेंजरमुडू येथे सोमवारी संध्याकाळी एका २३ वर्षीय तरुणाने पाच जणांची हत्या केली. आरोपीने त्याची प्रेयसी, भाऊ, आजी, काका आणि काकू यांची चाकू आणि हातोड्याने निर्घृण हत्या केली. यानंतर, आरोपीने आईवर हल्ला केला आणि तिलाही मारण्याचा प्रयत्न केला. तरुणाने पूर्ण नियोजन करून तीन वेगवेगळ्या ठिकाणी ही घटना घडवून आणली. त्यानंतर तो वेंजरामूडू पोलिस ठाण्यात गेला आणि आत्मसमर्पण केले आणि आपला गुन्हा कबूल केला. पोलिस स्टेशनमध्ये आरोपीने सांगितले की त्याने त्याची आई आणि मैत्रिणीसह ६ जणांची हत्या केली आहे. आरोपीचे नाव अफान आहे.
पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे, ज्यात आरोपीचा भाऊ अहसान, आजी सलमा बिवी, काका लतीफ, काकी शाहिदा आणि त्याची मैत्रीण फरशाना यांचा समावेश आहे. आरोपींविरुद्ध २ पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी सांगितले की, तरुणावर खूप कर्ज होते आणि त्याच्या कुटुंबाने त्याला ते परतफेड करण्यास नकार दिला होता. याच कारणामुळे तरुणाने ही घटना घडवली. आरोपीने पोलिसांना सांगितले की, तो आखाती देशात व्यवसाय करत होता पण तिथे त्याचे मोठे नुकसान झाले. यामुळे त्याने खूप कर्ज घेतले होते. पण कुटुंबाने त्याला मदत केली नाही, म्हणून त्याने सर्वांना मारले.
तथापि, आरोपींनी जे सांगितले त्याबद्दल पोलिसांना शंका आहे. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अफानचा मोबाईल फोन आणि कॉल डिटेल्स तपासले जात आहेत. आरोपी अफानने त्याची आई शेमी (४७ वर्ष) हिच्यावरही हल्ला केला. कर्करोगाची रुग्ण आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना सध्या तिरुअनंतपुरम येथील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अफानलाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याने पोलिसांना सांगितले होते की त्याने उंदीर मारण्याचे विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता.