
जळगाव मिरर | १४ जून २०२४
राज्यातील अनेक शहरात प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना नुकतेच छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील येलदरी येथून जवळच असलेल्या मुरूमखेडा शिवारात अशीच एक घटना उघडकीस आली आहे. गेल्या चार वर्षांच्या प्रेमानंतरही दुर्लक्ष करणाऱ्या प्रेयसीचा प्रियकरानेच साडीच्या पदराने गळा आवळून खून केला. ही घटना बुधवार (१२ जून) रोजी उघडकीस आली. संशयिताला पोलिसांनी सेलू तालुक्यातील कुपटा येथून ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, यात खून झालेल्या महिलेचे नाव वैशाली जालिंदर तामडे (३०, रा. खैरी प्लॉट, जिंतूर) असे असून मृत वैशाली विवाहित होती तरीही २०२१ पासून संशयित गोपाळ दिनकर इक्कर (२५) याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. परंतु चार वर्षांच्या प्रेमानंतरही वैशाली त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती. यामुळे वैशालीचे इतर कुणासोबत संबंध असल्याचा संशय गोपाळला आला. यामुळे दोघांमध्ये वाद होत असे. याच कारणावरून गोपाळने वैशालीला मंगळवारी जिंतूर येथून त्याच्या दुचाकीवर येलदरी येथील तलावाच्या बाजूस असलेल्या मुरूमखेडा शिवारातील टेकडीवर नेले. त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. या वादातूनच गोपाळने साडीच्या पदराने गळा आवळून तिचा खून केला आणि तिचा मृतदेह तिथेच सोडून दुचाकीवरून तो पसार झाला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुपटा येथून गोपाळला अटक केली.
याप्रकरणी वैशालीचा पती जालिंदर तामडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. पत्नीच्या खुनात शिक्षा वैशालीसोबत प्रेम जुळल्यानंतर २३ मार्च २०२२ रोजी गोपाळचे लग्न कल्पनासोबत झाले. लग्नाच्या एक महिन्याने वैशालीला ही बाब समजली. त्यामुळे कल्पनाला फारकत द्यावी असे वैशालीने गोपाळला सांगितले. म्हणून गोपाळने रुमालाने गळा आवळून पत्नी कल्पनाचा खून केला होता. याप्रकरणी त्याला शिक्षाही झाली होती. काही महिन्यांपूर्वीच तो बाहेर आला होता.





















