जळगाव मिरर | २८ डिसेंबर २०२५
जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीने आपली रणनीती स्पष्ट करत जागावाटपाचा महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष ३८ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष ३७ जागांवर निवडणूक लढविणार आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा केली.
काही दिवसांपूर्वी दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे संकेत देत होते. मात्र भाजप–शिवसेना महायुतीला थेट आव्हान देण्यासाठी अखेर दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांनी शिवसेना (उबाठा) नेतृत्वाशी सविस्तर चर्चा करून जळगाव मनपेसाठी ‘३८–३७’ असा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केल्याचे सांगितले. जळगाव महानगरपालिकेच्या एकूण ७५ जागांसाठी ही आघाडी आता मैदानात उतरणार आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना चौधरी यांनी स्पष्ट केले की, हे जागावाटप जरी दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये झाले असले तरी महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांनाही सोबत घेतले जाणार आहे. ज्या जागा ज्या पक्षाला सुटल्या आहेत, त्यातून मित्रपक्षांना जागा सोडण्याचा निर्णय संबंधित पक्षप्रमुख घेतील. “आम्ही लहान पक्षांशीही चर्चा सुरू ठेवली असून, गरज भासल्यास जागांमध्ये फेरबदल करण्यात येईल,” असेही त्यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, माजी खासदार उमेश दादा पाटील, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार, एजाज मलिक, शिवसेना (ठाकरे गट) महानगरप्रमुख शरद तायडे, संग्राम पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला आधीच जाहीर केल्यामुळे राजकीय आघाडी घेतल्याचे मानले जात असून, दुसरीकडे महायुतीत जागावाटपावरून अद्याप पेच कायम आहे. या नव्या राजकीय समीकरणामुळे जळगाव महानगरपालिका निवडणूक आता अधिकच चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.




















