जळगाव मिरर | २१ जुलै २०२६
गोदामामध्ये साठवून ठेवलेला वेगवेगळ्या प्रकारचा पानमसाला व तंबाखूचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केला. ही कारवाई दि. १९ जुलै रोजी तालुक्यातील रायपूर येथे करण्यात आली. या प्रकरणी कुलदीप सीताराम परदेशी (वय ३३, रा. रायपूर, ता. जळगाव) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील रायपूर येथे पानमसाला साठवून ठेवल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे जाऊन पाहणी केली असता कुलदीप परदेशी याच्या दुकानाच्या बाजूला गोदामात पानमसाला आढळला. पथकाने तेथून पानमसाला, तंबाखूचे १३ पाकीटासह ३९३ पाऊच जप्त केले. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी आकांक्षा खालकर यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून कुलदीप परदेशी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ मुकुंद पाटील करीत आहेत.




















