
जळगाव मिरर | २७ मार्च २०२६
पाल वनक्षेत्रातील गारबर्डी परिमंडळात वनविभागाने मोठी धडक कारवाई करत अवैधरित्या डिंक संकलन आणि वाहतूक करणाऱ्या चार जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत तब्बल ७ हजार ५०० किलो डिंक जप्त करण्यात आला असून, त्याची अंदाजित किंमत सुमारे १५ लाख रुपये असल्याचे वनविभागाने सांगितले.
वनविभागाच्या पथकाने कक्ष क्रमांक ३२ मध्ये छापा टाकून आरोपी गणदास गबू डुडवे (वय ३८), अमित सुजाण मोरे (वय २१), सावन रणजित मोरे (वय २४, सर्व रा. मेंढागड, जि. खरगोन) तसेच हेमराज होरपाल चव्हाण (वय २२, रा. मांडवखेडा, जि. खरगोन) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुरुवातीला ११० किलो धावडा डिंक जप्त करण्यात आला.
त्यानंतर अधिक चौकशी केली असता पाल येथील एका व्यापाऱ्याच्या अवैध गोडाऊनचा उलगडा झाला. या ठिकाणी टाकलेल्या धाडीत धावडा, सलाई व कड प्रजातींचा एकूण ७,५०० किलो डिंक जप्त करण्यात आला. यामुळे या अवैध व्यापाराचे मोठे जाळे उघडकीस आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कारवाईदरम्यान शाईन कंपनीची चारचाकी (क्र. एमपी १० झेडए ८१४०) तसेच हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी (एमएच १९ एन ५३०८) ही वाहनेही जप्त करण्यात आली.
ही कारवाई उपवनसंरक्षक कृष्णा भवर व सहायक वनसंरक्षक सत्यजित निकत यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांच्या पथकाने केली. या मोहिमेत वनपाल संभाजी सूर्यवंशी, मोहसीन तडवी, रणधीर काटे, संजय बारेला, जगदीश बारेला, राजमल बारेला, सकीना तडवी, धनाबाई भादले, सविता बारेला, दीपक बारेला, मुकेश तडवी, आकाश बारेला तसेच पोलिस कॉन्स्टेबल जगदीश पाटील व ईश्वर चव्हाण यांनी सहभाग घेतला.
या कारवाईस रावेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांचे विशेष सहकार्य लाभले. पुढील तपास वनविभागाकडून सुरू असून, या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.





















