जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२३
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात हिवाळी अधिवेशन सुरु असल्याने अनेक मुद्यावर राजकारण तापत आहे. ११ डिसेंबर रोजी ठाकरे गटाचे नेते आ.भास्कर जाधव यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे.
अजित पवार यांना मुख्यमंत्री करा. मी पाठिंबा देतो आणि सभागृहात ठराव मांडतो. मला तुमचा दम बघायचा आहे. माझ्या पक्षाची हमी मी घेतो, असं आव्हान भास्कर जाधव यांनी भाजपाला दिलं. ज्याच्याबरोबर मैत्री कराल, त्याचं वाटोळं केल्याशिवाय राहत नाही, अशी टीकाही भास्कर जाधवांनी भाजपावर केली. यावर आता ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय जनता पार्टी अजित पवारांना कधीही मुख्यमंत्री करणार नाही. त्यांनी अजित पवारांचा वापर केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यासाठी केला. त्यामुळे भास्कर जाधव यांनी विधानसभेत उपरोधिक विधान केलं, अशी प्रतिक्रिया वैभव नाईक यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी वैभव नाईक म्हणाले, ” भारतीय जनता पार्टी प्रत्येकाचा वापर करून घेते. भाजपाने गेली २५ वर्षे शिवसेनेचा वापर केला. उद्धव ठाकरे यांनी पुढे शिवसेनेचा वापर करू दिला नाही, म्हणून आमची युती तुटली. तसेच भाजपा अनेकवेळा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करण्यास इच्छुक होती. अनेकदा बोलणीही झाली.”