जळगाव मिरर | ३ ऑक्टोबर २०२५
राज्यात आरक्षणाचा मुद्दा तापला असून यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील वयांच्यावर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे हा एक मनोरुग्ण माणूस आहे. मराठा समाजाने असा मूर्ख माणूस आपला नेता म्हणून कसा निवडला हेच समजत नाही, असे ते म्हणालेत. हाके यांच्या या विधानामुळे जरांगे व त्यांच्यातील वाद एका नव्या उंचीवर पोहोचण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे यांचा गुरुवारी दसरा मेळावा झाला. त्यात त्यांनी मराठा आरक्षण, संतोष देशमुख हत्याकांड, शेतकरी समस्या विशेषतः अतिवृष्टीग्रस्तांना करण्यात येणाऱ्या मदतीच्या मुद्यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. त्यांच्या या टीकेचा दाखला देत लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. एवढेच नाही तर त्यांच्यावर कालच्या दसरा मेळाव्यात अश्लिल चाळे व हावभाव केल्याचाही आरोप केला. लक्ष्मण हाके म्हणाले, रुग्णालयात असणारा माणूस नारायण गडावर जातो आणि तास दीड तास भाषण करतो. परत अश्लिल चाळे व हावभाव करतो. जाऊद्या. जरांगेंकडून अजून काय अपेक्षित आहे. तो तिसरी – चौथी शिकलेला माणूस आहे.
खरे तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला पाचवी – सहावीला मुक्तविद्यापीठात वगैरे सोय करावी. मग त्याला महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल म्हणजे काय? महाराष्ट्रातील जात वास्तव काय आहे? महाराष्ट्राची आरक्षण पॉलिसी काय आहे? हे समजेल. हे सर्वकाही त्याला केव्हा समजणार? मराठा समाजाने असा मूर्ख माणूस कसा काय नेता म्हणून निवडला व त्याच्या सांगण्यावरून महाराष्ट्रातील वातावरण एवढे कलुषित करून ठेवले आहे हे भयंकर आहे, असे ते म्हणाले.
लक्ष्मण हाके पुढे म्हणाले, मनोज जरांगे हा मनोरुग्ण माणूस आहे. त्या बिचाऱ्याचे शिक्षणच कमी आहे. एका बाजूला त्याच्या बुद्धीची किवही करावीशी वाटते आणि दुसऱ्या बाजूला जरांगे नावाचा माणूस या महाराष्ट्रात कशा पद्धतीने विष पेरत चालला आहे त्याचे प्रत्यंतरही येत आहे. आदिम काळात जशा रानटी टोळ्या भांडणे व मारामाऱ्या करायच्या, त्या पद्धतीने जरांगे यांचे वर्तन आहे.
दुसरीकडे, मनोज जरांगे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना संतोष देशमुख यांच्या खुनाचा बदला होणार असल्याचे विधान केले. ते म्हणाले, संतोष देशमुख यांच्या खुनाचा बदला होणार. या प्रकरणी फरार असलेल्या आरोपींची अद्याप अटक व्हायची आहे. ती लढाईपण आता सुरू होणार आहे. महादेव मुंडे खुनाचे काय झाले? गिते नावाचे आहेत, त्यांच्यासंदर्भात काय झाले? पुढे बघा, आणखी बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत. हे (धनंजय मुंडे, पंकजा मुंडे) आता आमच्या मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात गेले. यामुळे त्यांच्या बऱ्याच गोष्टी बाहेर येणार आहेत.
धनंजय मुंडे म्हणतात, मला काही लोकांनी अडचणीत आणले, पण बहिणीने सावरले. तासंतास सोबत बसून आधार दिला. प तो त्यांचा घरगुती प्रश्न आहे. त्याच्याशी आपल्याला काही करायचे नाही. साथ द्या नका देऊ, पण खुनाचा बदला होणार. संतोष देशमुखांचा जो खून केला, त्याला फाशी होणार, असे जरांगे म्हणाले.