जळगाव मिरर । ३ डिसेंबर २०२३
मराठा समाजाला सरसकट कुणबी आरक्षण मिळविण्याच्या मागणीसाठी लढा उभारणारे मनोज जरांगे-पाटील हे सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात दौरा करीत असताना जळगावात देखील त्यांचा दौरा असल्याने आज जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक गावात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. आज चाळीसगावात सकाळी तर दुपारी अमळनेर, धरणगाव व सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास जळगावात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातील बालगंधर्व सभागृहात त्यांची जोरदार सभा देखील सुरु झाली. यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा समाज बांधव बालगंधर्व सभागृहात दाखल झाले होते. यावेळी महाराजांच्या पोवाडे देखील आयोजकांतर्फे सादर करण्यात आले
जळगावात जंगी स्वागत !
जळगाव शहरातील खोटे नगर स्टॉपजवळ मनोज जरांगे यांचे फुलाची उधळण करीत स्वागत समाजबांधवानी तर त्यानंतर पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकारवार यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. शहरातील कोर्ट चौक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर देखील मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कि जय अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. तर शहरात आज भगवेमय वातावरण देखील झाले होते तर प्रत्येक ठिकाणी त्यांचे जेसीबीतुन फुलांद्वारे उधळण करीत स्वागत करण्यात आले. शहरातील मुख्य रस्त्यावर ठीक ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील लावण्यात आला होता.