
जळगाव मिरर | २८ एप्रिल २०२५
जुन्या घराची सौदा पावती करून एक कोटी १५ लाख रुपये घेऊनही मिळकतीची खरेदी करून देण्यास टाळाटाळ करून बांधकाम व्यावसायिक सुनील मधुकर चौधरी (वय ५२, रा. धरणगाव) यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. यातील संशयित मनोज लिलाधर वाणी (रा. जिल्हा परिषद कॉलनी) यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने दि. २८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव येथील सुनील चौधरी यांचा बांधकाम तसेच जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. जळगाव महापालिका हद्दीतील जुन्या बांधीव घराचा व्यवहार ठरवून सौदा पावती करण्यात आली. त्यासाठी चौधरी यांच्याकडून समोरील व्यक्तींनी एक कोटी १५ लाख रुपये घेण्यात येऊन करारनामा करण्यात आला. त्यानंतर मात्र सदर मिळकतीची खरेदी करून देण्यास टाळाटाळ केली जाऊ लागली. पाठपुरावा करून खरेदी होत तर नव्हतीच शिवाय रक्कमही परत मिळत नसल्याने आर्थिक फसवणूक झाली म्हणून सुनील चौधरी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मनोज लीलाधर वाणी, कल्पना मनोज वाणी, शैलेंद्र हेमचंद्र भिरुड, हेमलता उर्फ तनुजा शैलेंद्र भिरुड, तिलोत्तमा दीपक इंगळे, दीपक पीतांबर इंगळे, संदीप हरिभाऊ पाटील, राजेंद्र गोपाळ सावदेकर, शेखर भास्कर भिरुड, शिरीष भास्कर भिरुड, नरेंद्रकुमार दत्तात्रय भिरुड, ज्ञानेश्वर दत्तात्रय भिरुड, गौरव कृष्णा भिरुड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या गुन्ह्याचा तपास आर्थीक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यांनी संशयित मनोज वाणी यांना शनिवारी अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना दि. २८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून तपास सपोनि प्रमोद कठोरे करीत आहे.




















