जळगाव : प्रतिनिधी
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह्य व अश्लील भाषा वापरल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. याविरोधात मराठा समाज आक्रमक झाला असून, पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना पोलीस सेवेतून बडतर्फ करावे, या मागणीसाठी समस्त मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना निवेदन देण्यात आले.
काय आहे निवेदनात
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल अतिशय घाणेरडे, अक्षेपार्ह वक्तव्य केलेले असून त्याबाबतची दि. १३ सप्टेंबरची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. एका पोलीस निरीक्षक अशा महत्वाच्या व प्रतिष्ठेच्या पदावर नियुक्त असतांना एखाद्या समाजाबद्दल बेताल वक्तव्य करून संपूर्ण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना व त्यांना समर्थन देणारे अशोक महाजन यांना त्वरीत कायम स्वरूपी बडतर्फ / निलंबीत करण्यात येऊन त्यांच्याविरूद्ध सामाजिक भावना दुखविल्याबाबत व महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील नियम, अटी व शतींचा भंग केला असल्याने त्यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून कड़क कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा सकल मराठा समाजातर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. सदर निवेदनाची प्रत मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. मा. गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. मा. विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र राज्य, मुंबई. मा. पालकमंत्री जळगाव जिल्हा. मा. पोलीस आयुक्त नाशिक. मा. जिल्हाधिकारी जळगाव, यांना पाठवण्यात आली आहे.
याप्रसंगी मराठा समाजाचे पदाधिकारी व महिला यांनी आक्रमक भूमीका घेत कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान, संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यात झालेल्या संभाषणाबाबत कारवाईचे आदेश देण्यात आले असून, तसा अहवाल वरिष्ठांकडे पोहचविण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असल्याची ग्वाही जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांनी दिली.